कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने 20 लाख 80 हजार रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नीलेश रामकुमार पाटील व पूर्वा नीलेश पाटील (रा. ढिसाळ गल्ली, जुना बुधवार पेठ) या दाम्पत्याविरुद्ध सोमवारी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला.
संशयित अनघा लक्ष्मी स्टॉक ब—ोकिंग प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी मंगळवार पेठेतील ललिता राजेंद्र मांगलेकर व त्यांचे पती राजेंद्र यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 1.5 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.
त्यावर विश्वास ठेवून मांगलेकर यांनी 21 लाख रुपयांची गुंतवणूक केली. एप्रिल 2019 अखेर परताव्यापोटी काही रक्कम त्यांना देण्यात आली. त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
मांगलेकर यांनी वेळोवेळी भेट घेऊन पैशाची मागणी केल्यानंतर पुन्हा 2.5 टक्के परतावा देतो, असे सांगून करार करून दिला. काही महिने परतावा दिल्यानंतर पुन्हा परताव्याची रक्कम देण्याचे बंद केले.
वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर संशयितांनी वडणगे (ता. करवीर) येथील विक्री केलेला प्लॉट मांगलेकर यांना करार करून दिला. दोन वर्षांत संशयितांनी 20 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.