कोल्हापूर

कोल्हापूर : जय शिवाजीचा अन् फुलेवाडीचाही

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अटीतटीच्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळावर 3-1 ने मात करून शिवाजी तरुण मंडळाने तर संध्यामठ तरुण मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करून फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने विजयी सलामी दिली.

सन 2022-23 च्या फुटबॉल हंगामाचा किक ऑफ शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेने मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला. पहिल्याच दिवशी मैदान तब्बल 80 टक्के भरले होते. यामुळे प्रचंड उत्साह-जल्लोष मैदानात होता. मात्र, याला गालबोट लावणारा प्रसंग घडला. मैदानावर खेळाडू तर प्रेक्षक गॅलरीत समर्थक एकमेकांच्या अंगावर धावले. यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामुळे सामना बराच वेळ थांबल्याने लांबला. शेवटी अंधारात सामना संपवावा लागला.

फुलेवाडीचा एकतर्फी विजय

दुपारी फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. परदेशी खेळाडूंसह खेळणार्‍या फुलेवाडी संघाने स्थानिक खेळाडूंसह खेळणार्‍या संध्यामठचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. चारही गोल फुलेवाडीचा खेळाडू स्टेन्ली ईजी याने अनुक्रमे 27, 42, 75 आणि 78 व्या मिनिटांना नोंदविले.

शिवाजीची खंडोबावर मात

दुसर्‍या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाची झुंज व्यर्थ ठरवत शिवाजी तरुण मंडळाने त्यांच्यावर 3-1 अशी मात केली. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला शिवाजीकडून विक्रम शिंदेने मारलेल्या फ्री किकवर संकेत साळोखेने गोल नोंदवत संघाला मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात 60 व्या मिनिटाला कोफी कोत्साहीने दुसरा गोल नोंदवून आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 82 व्या मिनिटाला खंडोबाच्या अबुबकर याने गोल नोंदवून सामना 2-1 असा केला. 88 व्या मिनिटाला शिवाजीच्या रोहित जाधवने मोठ्या डी बाहेरून थेट फटक्यावर गोलपोस्टचा अचूक वेध घेत संघाची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. उर्वरित गोल खंडोबाकडून न फिटल्याने सामना शिवाजी मंडळने जिंकला.

सामन्यात शिवाजीचा गोलरक्षक मयुरेश चौगुले, सिद्धेश साळोखे, संदेश कासार, रोहन आडनाईक यांनी तर खंडोबाकडून संकेत मेढे, प्रभू पोवार, सागर पोवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.

दिमाखदार उद्घाटन सोहळा

बापू आवळे यांच्या रणहलगीच्या तालात सर्व फुटबॉल संघांचे ध्वज घेऊन बालकल्याण संकुलच्या मुलांनी केलेले संचलन, शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 फुगे हवेत सोडून केलेला जल्लोष आणि फुटबॉलप्रेमींसाठी 22 फुटबॉल प्रेक्षक गॅलरीत टाकत कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचा दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला.

यानंतर स्पर्धेच्या आकर्षक चषकाचे अनावरण पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी केएसएचे चीफ पेट्रन शाहू महाराज, मनपाच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो.च्या महिला सदस्या सौ. मधुरिमाराजे, यशराजराजे, शहाजीराजे, उद्योजक तेज घाटगे, सुनील जमदाडे, माणिक मंडलिक, दीपक शेळके, संभाजीराव पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, अमर सासने, नंदकुमार बामणे, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, मनोज जाधव आदी उपस्थित होते. फुटबॉल निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले.

भरघोस बक्षिसांची घोषणा

केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या शाहू छत्रपती केएसए लीग स्पर्धेसाठीच्या बक्षिसात वाढ करण्याची घोषणा केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी केली. विजेत्या संघास 1 लाख रुपये, उपविजेत्या संघास 75 हजार आणि तृतीय क्रमांकास 50 हजार व चषक तसेच चार उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसासह 5 उत्कृष्ट खेळाडूंना रॉक रायडर सायकल भेट देण्यात येणार असल्याचे मालोजीराजे यांनी सांगितले. तसेच लीग स्पर्धेस उपस्थित फुटबॉलप्रेमींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून गिफ्ट व्हाऊचरही देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT