कोल्हापूर

कोल्हापूर : चिकनचे दर 100 रुपयांनी उतरले

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिना अवघा आठ दिवसांवर आला असून, त्र्यंबोली देवीची आषाढी यात्रा व पंचगंगा नदीच्या नव्या पाण्याच्या यात्रेची कोल्हापुरात धूम आहे. या पार्श्वभूमीवर चिकनचे दर मोठ्या प्रमाणात उतरल्याने खवय्यांची चंगळ आहे.

पोल्ट्रींमध्ये चिकनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि व्रतवैकल्यांचा श्रावण महिना या पार्श्वभूमीवर पोल्ट्री रिकामी करून नवीन पक्षीनिर्मितीसाठी व्यावसायिकांनी सुरू केलेले प्रयत्न यामुळे चिकनचे दर 80 ते 100 रुपयांनी कमी झाल्याची माहिती व्यावसायिक प्रदीप घोटणे यांनी दिली.

मटणाचे दर 600 ते 700 रुपये प्रतिकिलो टिकून असल्याने सर्वसामान्य खवय्यांना चिकन-मासे पर्याय आहेत. यामुळे चिकन मार्केटमध्ये चिकन खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. चिकनच्या जिवंत पक्ष्याचा दर 90 रुपये झाला आहे. चिकनचा प्रतिकिलो दर स्कीनसह 120 रुपये, तर बिगरस्कीन 160 रुपये आहे. बोनलेस चिकन 250 रुपये आणि लेगपीसचा दर 250 रुपये किलो आहे.

चिकनचे दर उतरल्याने हॉटेल्समधील चिकन थाळीचे दरही उतरले आहेत. तसेच चिकन 65, चिकन लॉलीपॉप, बटर चिकन, खर्डा चिकन, चिकन कोल्हापुरी यांसह चिकनच्या विविध पदार्थांना मागणी वाढली आहे. घराघरांतही या पदार्थांबरोबरच वडा-कोंबडासारख्या जेवणाचे बेत आखले जात आहेत. श्रावण सुरू होण्यापूर्वी आठ दिवस मांसाहारावर ताव मारण्यासाठी खवय्ये सज्ज झाले आहेत.

SCROLL FOR NEXT