कोल्हापूर

कोल्हापूर : चालत्या स्कूल बसमध्ये चालकाचा मृत्यू

दिनेश चोरगे

कौलव; पुढारी वृत्तसेवा :  शाहूनगर परिते येथील भोगावती हायस्कूलच्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असतानाच बरगेवाडी (ता. राधानगरी) गावानजीक चालकाला अचानक हृदयविकाराचा तीव्र  झटका येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला; मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून स्कूल बसमधील पंचवीसवर विद्यार्थ्यांचा जीव बचावला.

या परिसरातील सर्वात जुन्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या भोगावती हायस्कूलमध्ये दररोज परिसरातील विविध गावांतून विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून ने-आण केली जाते. या बसवर कौलव येथील सतीश साताप्पा कांबळे (वय 35) हा तरुण चालक म्हणून काम करत होता. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही बस ठिकपुर्ली-पिंपळवाडीमार्गे बरगेवाडीच्या म्हसोबा मंदिरानजीक आली असता कांबळेला हृदयविकाराचा तीव्र  झटका आला. त्या अवस्थेत कांबळे याने गाडी बाजूला घेत बंद केली व स्टेअरिंगवर मान टाकली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या लाकडाच्या ढिगाला जाऊन धडकली.

आजूबाजूला लोक जमा होताच चालकाला खाली उतरण्यात आले, मात्र त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते. या बसमध्ये जवळपास पंचवीसवर विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून बसची अन्य कोणत्याही वाहनाशी धडक झाली नाही. कांबळे याची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्याच्या पश्‍चात आई, पत्नी व दोन लहान मुले आहेत. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT