राशिवडे/कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : चांदे (ता. राधानगरी) येथील पुतणीचा वास्तुशांती कार्यक्रम आटोपून गावाकडे जाताना घाटातील वळणावर दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने श्रीमती कल्पना नारायण कुरणे (वय 42, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा) ठार झाल्या. राशिवडे ते चांदे मार्गावरील घाटात बुधवारी दुपारी हा अपघात झाला.
कल्पना या कसबा बावडा येथे धुणी-भांडी तसेच घरकाम करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या लहान मुलीचे लग्न झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी घरही खरेदी केले होते. मृतदेह केळोशी येथे माहेरी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
जखमी कुरणेंना राशिवडे येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले होते. सोबत असणार्या मुलाने आये उठ की गं म्हणत, आईला उठविण्याचा प्रयत्न केला; पण आईने प्रतिसाद न दिल्याने त्याने टाहो फोडला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.