कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : गुंठेवारी नियमितीकरणासाठी नगररचना विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करून दोन अधिकार्यांसह स्टाफ नियुक्त करा, नागरिकांना परिपूर्ण माहिती देऊन एकदाच बोलवा. हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी प्राधान्यक्रम ठरवून टोकन द्या, बहुतांश फायली मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, एजंंटगिरीला थारा देऊ नका, अशी सूचना आ. सतेज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिली. ताराबाई पार्कातील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात आ. पाटील यांनी विविध विषयांची आढावा बैठक घेतली.
नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन म्हणाले, गुंठेवारी नियमितीकरणाची 14 हजार 980 प्रकरणे आली होती. त्यातील 9 हजार 480 अर्ज निर्गत करण्यात आले आहेत. आ. पाटील यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत गुंठेवारी नियमितीकरणाच्या माहितीसाठी प्रशासकांनी जनजागृतीसाठी व्हिडीओ करावा. गुंठेवारीसंदर्भात सर्वेअरची मिटिंग घेऊन त्यांनाही भाग वाटून द्यावेत, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
आ. पाटील यांनी थेट पाईपलाईनच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी इन्स्पेक्शन वेलचे काम सुरू आहे. लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्ड्यांचे पॅचवर्क करावे, असेही आ. पाटील यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने पॅचवर्कचे नियोजन केले असून निविदाही प्रसिद्ध केली आहे. गणेशमूर्ती आगमन मिरवणुका आणि अनंत चतुर्दशी मिरवणुकीसाठीची तयारी अंतिम टप्यात असल्याचेही सांगण्यात आले.
माजी महापौर उदय साळोखे यांनी सुधाकर जोशी नगरातील झोपडपट्टीच्या जागेचा टीडीआर संबंधित मालकाला देऊन महापालिकेने जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली. नगररचना विभागाचे सहायक संचालक त्या जागेत कोणतेही बांधकाम नसल्याने टीडीआर देता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावर आ. पाटील यांनी जागेचा लेआऊट करावा. महापालिकेने धोरण निश्चित करून कार्यवाही करावी, असे सांगितले.
बैठकीला आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, लेखाधिकारी संजय सरनाईक, उपशहर अभियंता नारायण भोसले, अरुण गवळी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
अमृत योजनेच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट का केले नाही?
अमृत योजनेचे काम रखडले आहे. वारंवार बैठक घेतल्या. सूचना देऊनही ठेकेदार कंपनीवर कारवाई का केली नाही? योजना पूर्ण करत नसतील तर संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करा, अशी सूचना आ. पाटील यांनी दिली. जल अभियंता घाटगे यांनी दोन महिन्यात कंपनीने समाधानकारक काम न केल्यास ब्लॅकलिस्ट करू, असे सांगितले.