कोल्हापूर

कोल्हापूर : खूप घाबरले; पण संपर्काने धीर : ऋतुजा

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शुक्रवारचा दिवस… झोपेत असतानाच सकाळी सकाळी वडिलांचा फोन आला. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर आल्यानंतर युद्धाची दाहकता समजू लागली. बाहेर कसे पडायचे हाच प्रश्न होता. भारतीय दूतावासाने मदत केली. रोमानियाच्या नागरिकांनी आधार दिला आणि आम्ही सुखरूप पोहोचलो, अशा शब्दांत ऋतुजा कांबळे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. युक्रेनमधील निप्रॉपेट्रोव्स्क शहरातील निप्रो स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ऋतुजा मेडिकलचे शिक्षण घेत आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला. यानंतर युक्रेनमधील भारतीयांना देशात सुरक्षित पोहोचविण्यासाठी भारत दूतावासाने विशेष मदत कक्ष सुरू केला.

दि. 25 फेब्रुवारी रोजी आम्हाला रोमानियाला हलविण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर तेथील नागरिकांनी आम्हाला धीर देत आमच्या भोजनाची व्यवस्था केली. आमचे विद्यापीठ कीव्ह शहरापासून सुमारे पाचशे कि.मी. अंतरावर असल्याने आम्हाला लवकर रोमानियाला जाता आले. रोमानियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी दाखल होत होते. हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. आम्हाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने विशेष विमान पाठविले. सुदैवाने पहिल्याच यादीमध्ये माझे व आर्या चव्हाणचे नाव होते. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला. शनिवारी रात्री मुंबईत पाय ठेवताच सुटकेचा नि:श्वास सोडला.

व्हिडीओ कॉलचा आधार

ऋतुजा रविवारी रात्री साडेदहा वाजता कोल्हापुरात पोहोचली. युद्धामुळे कुटुंबातील सर्वजण माझ्या काळजीत होते. त्यामुळे सतत ते व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. हा व्हिडीओ कॉलच माझ्यासाठी मोठा आधार ठरल्याचे ऋतुजाने सांगितले.

SCROLL FOR NEXT