कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अबालवृद्धांना प्रतीक्षा लागून राहिलेला दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. दिवाळी सणासाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी बुधवारीही बाजारपेठांमध्ये दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठीच्या उत्साहाला उधाण आले होते.
गेला आठवडाभर प्रचंड पाऊस होता; मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने खरेदीला लोक सहकुटुंब बाहेर पडले होते. संपूर्ण जिल्ह्यातून विशेषतः ग्रामीण भागातून लोक खरेदीसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते. यामुळे महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, गांधीनगर यासह ठिकठिकाणचे मॉल्स, एमआयडीसीसह व महामार्गांवरील कापड दुकाने, कुंभार गल्ल्यांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
शाळा-महाविद्यालयांच्या सहामाही परीक्षा संपल्याने दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे. यामुळे बालचमू आपल्या पालकांसह दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठांमध्ये दाखल होऊ लागला आहे. रेडिमेड कपडे, तयार फराळाचे पदार्थ, सुगंधी तेल-उटणे-साबण, अत्तर-सेंट, ड्रायफु्रटस्, गिफ्ट आर्टिकल्स यासह विविध वस्तूंची दुकाने हाऊसफुल्ल होती. याशिवाय पानलाईन, कुंभार गल्ली, ताराबाई रोड, पापाची तिकटी यासह ठिकठिकाणी आकाशकंदील, मातीचे दिवे, शोभेच्या वस्तू, रांगोळ्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. फटाक्यांच्या दुकानातही लोकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाचा भरवसा नसल्याने लोक छत्री-रेनकोटसह तयारीनेच बाजारपेठांमध्ये दाखल झाले होते. व्यवसायिकांनीही पावसासाठीची उपाय-योजना म्हणून मांडवावर पत्र्यांची व्यवस्था केली होती.