कोल्हापूर

कोल्हापूर : ‘केएमसी’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत

Arun Patil

कोल्हापूर, प्रवीण मस्के : यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेजच्या वरिष्ठ विभागाच्या तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मुुलाखती तिसर्‍यांदा रद्द करण्यात आल्या आहेत. महापालिका शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वेळेत वर्ग होत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे.

केएमसी कॉलेजच्या वरिष्ठ विभागाच्या 25 जागांसाठी तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मुलाखती 8 सप्टेंबर रोजी होणार होत्या; परंतु अतिरिक्त आयुक्त आजारी असल्याचे कारण सांगून त्या रद्द करण्यात आल्या. त्यावेळी ज्या उमेदवारांचे अर्ज मुलाखतीसाठी आहेत, त्यांनाच फोन करून पुन्हा पुढची तारीख देण्यात आली. त्यानुसार 4 ऑक्टोबर मुलाखतीची तारीख मिळाली; परंतु आदल्या दिवशी पुन्हा मुलाखती रद्द झाल्याचे कळविण्यात आले. मात्र, यावेळी कोणतेही कारण सांगितले गेले नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

तिसर्‍यावेळी मुलाखतीची 18 ऑक्टोबर तारीख उमेदवारांना दिली गेली. मात्र, आदल्या दिवशी 17 तारखेला रात्री उशिरा आयुक्तांच्या आदेशानुसार मुलाखती रद्द केल्याचे सर्व उमेदवारांना कळविण्यात आले. प्राचार्यांनी यासंदर्भात महापालिकेशी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नाही, अशी परिस्थिती आहे. मुलाखतीसाठी एक उमेदवार नांदेडवरून आला होता. त्याला मुलाखती रद्द झाल्याचे समजले. आतापर्यंत त्याच्या तीन फेर्‍या झाल्या आहेत. मग त्याच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण? पुन्हा नव्याने जाहिरात काढून मुलाखती घेतल्या जातील असे सांगण्यात आले. मात्र, मुलाखती का रद्द केल्या? याचे कारण दिलेले नाही. पुन्हा नव्याने जाहिरात काढून मुलाखती घेऊन शिक्षण विभागास काय साध्य करायचे आहे, असा सवाल पात्र उमेदवारांनी केला आहे.

ऐन दिवाळीत सीएचबी प्राध्यापकांचा शिमगा

महाविद्यालयांचा प्रथम सत्र कालावधी संपत आला आहे. महाविद्यालयात सीएचबी प्राध्यापक नेमणुका झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इतर सर्व महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांना दिवाळीचा पगार मिळणार आहे; परंतु अद्याप केएमसी महाविद्यालयाच्या मुलाखती न झाल्याने सीएचबी प्राध्यापकांत अस्वस्थता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे.

SCROLL FOR NEXT