कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : झिम्मा-फुगडी, काटवट कणा, घागर घुमवणे अशा पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन मिळावे, तसेच रोजच्या धावपळीतून सुटका करत महिलांना आपल्या अंगभूत कलांचे प्रदर्शन करता यावे, यासाठी दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने 'नाच गं घुमा' या झिम्मा – फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार पेठ येथील शुभंकरोती सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी (दि. 23) दुपारी 1 वाजता या स्पर्धा होणार असून, दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात यंदा झिम्मा-फुगडीसह महिलांच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, या हेतूने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. याद्वारे महिलांच्या आरोग्यालाही चालना मिळते. म्हणूनच या कार्यक्रमात खास महिलांसाठी च0उ मार्फत आरोग्य मार्गदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे.आहाराबाबत महत्त्वपूर्ण माहिती खास कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आहार तसेच स्त्रियांच्या मोनोपॉझ विषयीच्या अनेक समस्यांचे निराकरण या ठिकाणी होणार आहे.
कार्यक्रमात समूह स्पर्धेत 10 ते 12 स्पर्धकांनी 10 मिनिटांत आपल्या समूहाचे सादरीकरण करायचे आहे. स्पर्धेकरिता नावनोंदणी आवश्यक असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. समूह स्पर्धेसाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार आणि उत्तेजनार्थ 5 हजारांची 2 बक्षिसे, तसेच वैयक्तिक स्पर्धेसाठी 1 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी इच्छुक महिलांनी सभासद नोंदणी करणे बंधनकारक असेल.
'कस्तुरी क्लब'ची नवीन वर्षातील सभासद नोंदणी सुरू झाली आहे. सभासद होताच बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंग थर्मास व ओळखपत्र दिले जाणार आहे. जास्तीत जास्त महिला व युवतींनी आपली नाव नोंदणी करून लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 8805007724 या नंबरवर संपर्क साधावा.