कसबा बीडः पुढारी वृत्तसेवा
शिलाहर राज्याची राजधानी व प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे थळोबाचे मंदिर परिसरातील शेतशिवारात भांगलताना येथील सौ. बाळाबाई शिवाजी तिबिले यांना कमळसद़ृश अंकानाकृती सुवर्णमुद्रा (बेडा) सापडला आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे अशा सुवर्णमुद्रा अनेक ग्रामस्थांना सापडल्या आहेत. त्यामुळे सुवर्णमुद्रांचा पाऊस पडणारे कसबा बीड गाव अशी पुनःश्च प्रचिती आली आहे.
तिबिले यांना सापडलेला बेडा 8 मि.मी.चा असून एका बाजूवर कमळाकृती सुबक कोरीव नक्षीकामसद़ृश अंकन तर दुसर्या बाजूवर उभवटा आहे. अशा या बेडांना स्थानिक भाषेत सुवर्णमुद्रा असे म्हणतात. यापूर्वीही अनेकांना शेतात काम करताना अशा बेडा सापडल्या आहेत. चालूवर्षी सापडलेली तिसरी बेडा असून अनेकांनी या बेडा देव्हार्यात पूजल्या आहेत. विशेष म्हणजे येथे सापडणार्या प्राचीन वास्तुशिल्पांचे मंदिर परिसरात ग्रामस्थांनी संग्रह करून संवर्धन केले आहे.