कोल्हापूर

कोल्हापूर : कचर्‍याचे सर्व इनर्ट मटेरियल टाकाळ्यात

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापुरात कचर्‍यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. परिणामी, वर्षानुवर्षीचा कचरा साठून डोंगर तयार झाले आहेत. त्या कचर्‍यावर प्रक्रिया करून शिल्लक राहिलेले इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टाकाळा खणीत सुमारे 7 कोटी रुपये खर्चून लँडफील साईट (शास्त्रोक्त पद्धतीने भूमी भराव क्षेत्र) बांधण्यात आली. परंतु, 'सरकारी काम अन् सहा महिने थांब,' अशा पद्धतीने महापालिकेचा कारभार झाला. सात-आठ वर्षे लँडफील साईट तशीच पडून आहे. आता मात्र महापालिका जागी झाली आहे. त्यामुळे लाईन बाजारमधील कचर्‍याचे इनर्ट मटेरियल आता टाकाळ्यात टाकले जाणार आहे. महापालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लाईन बाजारमधील बायोमायनिंग प्रकल्पात तयार होणारे सुमारे दोन लाख टन इनर्ट मटेरियल येथे टाकण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरातील दैनंदिन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा विल्हेवाटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेच्या मागणीनुसार शहरातील टाकाळा खण येथील पडीक, धोकादायक व वापरात नसलेली खण लँडफील साईट म्हणून विकसित करण्यास उपलब्ध करून देण्यात आली. टाकाळा येथील 1180/क या 3.24 आर. क्षेत्रातील खणीची जागा बगिचासाठी आरक्षित करण्यात आली आहे.

या ठिकाणी झूम प्रकल्पातील कचर्‍यावर प्राथमिक प्रक्रिया करूनच चाळण पद्धतीने राहिलेल्या कचर्‍याचे घटक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या निकषानुसार टाकाळा खणीत टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या भल्यामोठ्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. खणीच्या तळात मुरूम टाकून लेव्हल करण्यात आली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या साईजनुसार ड्रेनेज सिस्टीम तयार केली आहे. त्यावर इनर्ट मटेरियल टाकण्यात येणार आहे. इनर्ट मटेरियलमध्ये लिचेड तयार झाल्यास त्यासाठी एक संप टँकही बांधण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

इनर्ट मटेरियल म्हणजे काय?

मोठ्या प्रमाणात साठलेल्या कचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यातून प्लास्टिक, आरडीएफ आणि माती वेगवेगळे करण्यात येते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या मटेरियलवर पुन्हा कोणतीच प्रक्रिया होऊ शकत नाही. ती खरमाती असते. त्याला इनर्ट मटेरियल म्हटले जाते. त्याचा वापर डंपिंगसाठी करता येतो. इनर्ट मटेरियल चांगले खतही होऊ शकते.

लँडफील साईटचाच झाला कचरा कोंडाळा

टाकाळा लँडफील साईटसाठी ठेकेदार कंपनीला 3 मार्च 2013 रोजी वर्कऑर्डर देण्यात आली. डिसेंबर 2015 मध्ये काम पूर्ण झाले. स्थानिक नागरिकांच्या विरोधासह प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे लँडफील साईट उपयोगात आली नाही. सात-आठ वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली. ड्रेनेज सिस्टीमही खराब झाली. एकूणच टाकाळा लँडफील साईटच आता कचरा कोंडाळा झाल्याची स्थिती आहे.

झूम परिसरात बायोमायनिंग प्रकल्प

20 ते 25 वर्षे लाईन बाजारमधील झूम परिसरात कचरा ठेवला जात आहे. सुमारे पाच लाख टन कचरा साठल्याने त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प उभारला आहे. खासगी कंपनीला 20 कोटी 37 लाखांचा ठेका दिला आहे. प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1,200 टन आहे. 13 नोव्हेंबर 2018 रोजी बायोमायनिंगला सुरुवात झाली. जुन्या कचर्‍याचे डोंगर संपायचे आहेत तोपर्यंत नव्या सुमारे तीन ते चार लाख टन कचर्‍याचे डोंगर उभारले आहेत.

SCROLL FOR NEXT