कोल्हापूर

कोल्हापूर : कचर्‍याची समस्या गंभीर; मोकाट जनावरांचा उपद्रव

मोहन कारंडे

कोल्हापूर; एकनाथ नाईक : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभार रचना अमलात आली आहे. जवाहरनगर, सुभाषनगर, सरनाईक कॉलनी आणि आयसोलेशन हॉस्पिटल परिसर मिळून प्रभाग क्रमांक 19 तयार केले आहे. या प्रभागाची लोकसंख्या 17 हजार 735 इतकी आहे. या प्रभागात कचर्‍याची समस्या गंभीर असून वेळेत कचरा उठाव होत नसल्याने रस्त्यासह मोकळ्या जागेत मोठे ढिगारे साचले आहेत. भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तुंबलेल्या गटारींमुळे सुभाषनगर परिसरातील नारिकांचा श्वास कोंडला आहे. परिसरातील तुंबलेल्या गटारीतील कचरा काढण्याचे काम सुरू आहे.

अजूनही हा प्रभाग काही नागरी सुविधांपासून वंचित राहिला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या द़ृष्टीने येथे आयसोलेशन हॉस्पिटल आहे. त्यामुळे आरोग्याच्या बर्‍यापैकी सोयी- सुविधा येथे उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलच्या इमारतीभोवती खुरट्या झुडपांनी अतिक्रमण केले असून समोर मोकळे मैदान आहे. या मैदानाभोवती खरमातीचे ढीग आहेत. जवाहरनगर हायस्कूलच्या इमारतीला लागून नागरिकांनी कचर्‍याचा कोंडाळा केला आहे. मैदानाच्या सभोवती फुटलेल्या फरशा, अनावश्यक साहित्य परिसरातील नागरिकांनी आणून टाकले आहे. शेजारीच कक्कया विद्यालयाची इमारत आहे. इमारतीला रंगरंगोटी केली आहे. मात्र, इमारतीच्या संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. छोट्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट मोडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक येथे कचरा टाकतात. हे विद्यालय गोरगरिबांच्या मुलांसाठी मोठा आधार आहे.

संत रोहिदास स्मारक सुसज्ज आहे; पण तेथून पश्चिम दिशेला जाणार्‍या रस्त्यावर नागरिकांनी कचरा टाकला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा समावेश आहे. वार्‍यामुळे हा कचरा अन्य ठिकाणी पसरतो. शेंडा पार्क येथील चौकात वारंवार पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनला गळती लागते. गळती लागली की, महापालिकेच्या बांधकाम विभाग खोदकाम करतो. त्यावर तात्पुर्ती मलमपट्टी केली जाते आणि गळती थांबली का, हे पाहण्यासाठी तो खड्डा महिना ते पंधरा दिवस तसाच असतो. सध्या शेंडा पार्क चौकात खोदलेला असाच एक खड्डा गेले पंधरा दिवस वाहतुकीस अडथळा ठरत आहे. निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात किंवा झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. सिरत मोहल्ला येथे महापालिकेच्या वतीने सिरत मोहल्ला सांस्कृतिक हॉल बांधण्यात आला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. प्रभागातील रस्ते सुसज्ज आहेत. मात्र गटारी छोट्या असल्याने पाणी निचरा गतीने होत नाही. काही ठिकाणी पाणी तुंबून राहते. कचरा साचल्यास पाणी रस्त्यावर येते. सुभाषनगर येथील झोपडपट्टीत सुसज्ज सुविधा व्हाव्यात, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

प्रभाग क्रमांक 19 ची व्याप्ती
आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, नेहरूनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, दत्त कॉलनी, सरनाईक वसाहत, आशीर्वाद कॉलनी मंगल कार्यालय, वीर कक्कया विद्यालय, सुभाषनगर शाळा, संत रोहिदास स्मारक, म्हाडा कॉलनी, सिरत मोहल्ला अशा सर्व भागांचा या प्रभागामध्ये समावेश आहे.

पोलिस चौकी धूळखात
सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरूनगर परिसरात अनेक वेळा वाद होत असतात. त्यामुळे या भागातील नागरिक हैराण आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी हवेशीर मोकळी जागा असून रात्री ओपन बारही दररोज पाहायला मिळतात. दारू पिल्यानंतर रिकाम्या बाटल्या येथेच फोडल्या जातात. अशांना जरब बसावी, यासाठी पोलिसांचा वॉच असणे गरजचे आहे. त्यासाठी सुभाषनगर येथे पोलिस चौकी आहे. मात्र, ही चौकी पौलिसांच्या प्रतीक्षेत असून अक्षरशः ती धूळ खात पडली आहे.

डिवॅटस् सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद
आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागे कोल्हापूर महानगरपालिकेचे डिवॅटस् सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. 13 मार्च 2007 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झाला. काही दिवस हा प्रकल्प सुरू राहिला. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. सध्या त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

अनेकजण इच्छुक
नव्याने झालेल्या या प्रभागात निवडणुकीसाठी विविध पक्षांमधून अनेकजण इच्छुक आहेत. त्यांनी अनेक उपक्रम राबवून नागरिकांशी संपर्क वाढविला आहे. काहींनी आपले वाढदिवस मोठ्याने केले, तर समारंभाच्या निमित्ताने ऊठ-बसही इच्छुकांनी वाढविली आहे. प्रभागातील नागरिकांचे वाढदिवस चक्क डिजिटलद्वारे शुभेच्छा देऊन होत आहेत.

रस्ते, गटारी, स्वच्छतागृहे, सार्वजनिक हॉल, व्यायामशाळा, उद्यान विकास यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. ज्या ठिकाणी निधीची कमतरता भासली, तेथे स्वतःचे पैसे खर्च केले. कोरोना काळात औषधे आणि गरजूंना धान्य वाटप केले. गेली 40 वर्षे कुष्ठरोगींसह त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत आहे. फुटबॉल, कुस्ती स्पर्धेसाठी सहकार्य करीत आहे. टीडीआरमाफियांनी बळकावलेल्या जमिनीसाठी संघर्ष सुरू आहे.
– भूपाल शेटे, माजी महापौर

SCROLL FOR NEXT