कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मात्र, 65 मि.मी.पेक्षा सातत्याने अधिकचा पाऊस आणि ज्या क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे तेथे 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांची हानी हे ओला दुष्काळ जाहीर करण्याचे मुख्य निकष आहेत.
यंदा राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पाऊस सुरू असल्याने रब्बीच्या हंगामालाही धोका असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे ओला दुष्काळाबाबत 'एनडीआरएफ' आणि 'एसडीआरएफ'चे निकष बाजूला ठेवून मदत देण्याची मागणी केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करायचा झाला, तर त्यासाठी असलेल्या निकषांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये 65 मि.मी.पेक्षा जास्त सततचा पाऊस आणि 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांची हानी हे प्रमुख निकष आहेत. राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात अशा कोणत्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करायचा त्या क्षेत्रातील 33 टक्के पिकांची हानी झाली पाहिजे. याबाबत आता सरकारने आता पंचनाम्याचे आदेश दिले असून, त्याची आकडेवारी आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.