कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : एप्रिल-मे महिन्यात जशा रखरखत्या झळा जाणवतात व उन्हाचे चटके बसतात, तशा झळा आणि चटके फेब—ुवारीतच बसू लागले आहेत. यावर्षी ऐन फेब्रुवारी महिन्यात वैशाख वणव्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांत फेब—ुवारी महिन्यात प्रथमच पारा 36 अंशापर्यंत गेला आहे. बुधवारी कोल्हापूरचे तापमान 35.6 अंश नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दिवसा उकाडा आणि सायंकाळी थंडी अशीही परिस्थिती काही दिवस होती. यामुळे फेब—ुवारीतही म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. याउलट फेब—ुवारीत उन्हाच्या झळा वाढल्या. गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापमान 33 ते 35 अंशादरम्यान आहे. पार्यात चढ-उतार सुरू असला तरी हवेतील उष्मा वाढत चालला आहे. यामुळे नागरीक हैराण होऊ लागले आहेत.
बुधवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी एक ते अडीच या दरम्यान उन्हाचे चटके अधिक जाणवत होते. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, उमा टॉकीज, माळकर तिकटी आदी वाहनांची वर्दळ असलेल्या भागात तर उन्हाचा तडाखा अधिक जाणवत होता.
जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी 25 फेब—ुवारी 2019 मध्ये फेब—ुवारी महिन्यातील सर्वाधिक 36.3 इतक्या तापमानाची नोंद झाली होती. गेल्या तीन वर्षांत पारा 35 अंशावरच राहीला होता. यावर्षी तो पुन्हा 36 अंशापर्यंत गेला आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होईल. मात्र, किमान तापमानात वाढ होईल, यामुळे थंडी पूर्णपणे कमी होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.