सरुड; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शाहूवाडीच्या सुनबाई ऋतुजा रमेश लटके यांनी एकतर्फी विजय मिळविल्यानंतर शाहूवाडी तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी ऋतुजा लटके यांना फोनवरून विजयाच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले.
दरम्यान, मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील आमदार रमेश लटके हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई परिसरातील धुमकवाडी गावचे रहिवाशी. गवळ्याचा मुलगा ते अंधेरी (पू.) मतदारसंघाचा आमदार असा लटके यांचा प्रवास थक्क करणारा ठरला होता. दुर्दैवाने हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आणि हा प्रवास अकाली ठप्प झाला.
शिवसेनेचे माजी आ. सत्यजित पाटील, प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी अंधेरी (पू.) विधानसभा मतदारसंघात प्रचारमोहीम राबविली होती. रविवारी सकाळी निवडणूक निकाल जाहीर होताच लटके यांचे गाव येळवण जुगाई पैकी धुमकवाडी, शाहूवाडी, मलकापूर, बांबवडे येथे विजयोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, तालुका प्रमुख दत्तात्रय पोवार, माजी सभापती स्नेहा जाधव, विजय खोत, महिला आघाडी तालुका प्रमुख अलका भालेकर, युवती आघाडीच्या तालुका प्रमुख पूनम भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.