कोल्हापूर

कोल्हापूर : ई-स्टोअरच्या नावाखाली 38 लाखांची फसवणूक

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  बेस्ट बिझनेस अ‍ॅपॉर्च्युनिटी ई-स्टोअर इंडिया जनेरस इन्कम या योजनेंतर्गत ई-स्टोअर सुरू करून देण्याच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विनायक कृष्णा राऊत (रा. कासारवाडा, ता. राधानगरी), प्रकाश शंकर चौगले (रा. शाहूपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर) आणि अरविंद सत्यनारायण मिश्रा (रा. राजारामपुरी, 7 वी गल्ली, कोल्हापूर) या तिघांना अटक करण्यात आली. याबाबत शुभांगी शशिकांत पाटील (वय 45, रा. फुलेवाडी रोड) यांनी फिर्याद दाखल केली.

फिर्यादी शुभांगी पाटील यांना शिराळा (जि. सांगली) येथे ई-स्टोअर सुरू करून देण्याचे आमिष संशयितांनी दाखवले. वेदिका आयुर केअर हेल्थ अँड रिटेल प्रा. लिमिटेड कंपनीच्या बँक खात्यावर 30 लाख रुपये भरून घेतले. तर यानंतर वेगवेगळ्या कंपनीत आठ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. यातून दरमहा अडीच लाख रुपयांचा नफा मिळवून देऊ, असे भासवले होते. ऑगस्ट 2021 पैसे भरूनही त्यांना ई-स्टोअर किंवा इतर कोणताही परतावा देण्यात आला नाही. वारंवार मागणी करूनही संशयितांकडून टाळाटाळ सुरू असल्याने अखेर पाटील यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी याप्रकरणी विनायक राऊत, प्रकाश चौगले आणि अरविंद मिश्रा या तिघांना शनिवारी अटक केली, तर कंपनीच्या संचालकांसह विजय पाटील याच्यावरही गुन्हा दाखल आहे. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी केले आहे.

ई-स्टोअर इंडिया कंपनीच्या आयडीधारकांना पे आऊट 20 ते 30 डिसेंबरपासून सुरू होतील. 15 जानेवारी 23 पर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होतील. अलीशवळर या हाँगकाँग येथील कंपनीसोबत 1500 कोटींचा करार झाला आहे. भारत सरकारच्या नियमानुसार हे परदेशी चलन भारतात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. मे 2022 नंतर काही स्पर्धात्मक अडचणींमुळे कंपनीचे पे आऊट थांबले होते. आता डील झाल्याने कंपनीच्या भारतातील अकाऊंटमध्ये पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत.
– डॉ. फैजान खान,
सीएमडी, ई-स्टोअर इंडिया कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT