कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आघाडीच्या तडजोडीच्या राजकारणामध्ये आमच्यावर अन्याय करू नका, अशा भावना काही इच्छुकांनी नेत्यांसमोर व्यक्त केल्या. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इच्छुक सदस्यांच्या पन्हाळा येथे रविवारी मुलाखती घेतल्या.
सभापतींच्या नावावर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर सोमवारी (दि. 12) सायंकाळी शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी शासकीय विश्रामधाम येथे बैठक होणार आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्या सदस्यांना पन्हाळा येथे एकत्र ठेवले आहे. याठिकाणी सोमवारी होणार्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या तसेच मंगळवारी (दि. 13) होणार्या सभापतिपदाच्या निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती रविवारी घेण्यात आल्या. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपद असल्यामुळे त्यानी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अन्य चार समितींची सभापतिपदे दिली आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
शिवसेनेकडून इच्छुक असणार्या सदस्यांच्या मुलाखती शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्या. यामध्ये वंदना जाधव, कोमल मिसाळ, शिवानी भोसले, मनीषा कुरणे यांनी आपण इच्छुक असल्यामुळे संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, जिल्हा प्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीला अपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मुलाखती पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतल्या. अपक्ष निवडून आलेल्या रसिका अमर पाटील यांनी आपण सभापतिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चंदगड विकास आघाडीचे सर्व सदस्य पालकमंत्री सतेज पाटील यांना भेटले. कल्लाप्पाणा भोगण यांनी चंदगड तालुक्याला संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आ. पी. एन. पाटील उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपल्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य असून दोन्ही सदस्यांनी सभापतीपद भूषविले आहे.
आघाडीतील घटक पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एकत्रितपणे इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे असणारे एक पद कायम ठेवावे, अशी मागणी केल्याचे समजते.
मुलाखती झाल्यानंतर सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील, माजी आ. उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.