कोल्हापूर

कोल्हापूर : अवघा जिल्हा शिवमय

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार तमाम शिवभक्त, इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून इतर सण-उत्सवांप्रमाणेच शिवजयंतीही अत्यंत साधेपणाने आणि प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करण्यात आली होती. कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी चौक, निवृत्ती चौक, शिवाजी विद्यापीठासह ठिकठिकाणच्या शिवछत्रपतींच्या स्मारक परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. भगव्या पताका, भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला आहे. अनेक संस्था-संघटनांच्या वतीने चार-पाच दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन केले असून शिवशाहिरांचे पोवाडे, इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शिवज्योतीचे आयोजन यासह विविध सामाजिक, पर्यावरणपूरक, शैक्षणिक, आरोग्यदायी व लोकोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले आहे.

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट

जुना राजवाडा येथील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने नर्सरी बागेतील राजर्षी शाहू निर्मित शिवछत्रपतींच्या स्मारक मंदिरात शिवजयंतीचा पारंपरिक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता, छत्रपती घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

छत्रपती शिवाजी चौकात अभिवादन

शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. 19 रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पारंपरिक जन्मकाळ सोहळा व अभिवादन करण्यात येणार आहे.

श्री शिवाजी तरुण मंडळ

शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने उभा मारुती चौकात दि. 15 ते 19 फेब—ुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ऐतिहासिक देखावा, शिवशाहिरांचे पोवाडे, मर्दानी खेळ, रक्तदान शिबिर, व्याख्यान, शिवजन्मकाळ सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मावळा कोल्हापूर

मावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे दि. 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत अश्वारूढ पुतळा प्रतिष्ठापना, राजर्षी शाहू प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन, मावळा पुरस्कार वितरण, लाल महालातील रणसंग्राम सजीव देखावा, शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे.

विद्यार्थी कामगार मंडळाची शिवजयंती

शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे 19 ते 21 फेब्रुवारी  या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धा, आरोग्य शिबिर शिवचरित्र देखावा सादर करण्यात येणार आहे.

'सारथी'तर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

'सारथी' संस्थेच्या वतीने शिवजयंती विशेष निःशुल्क ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकाने आपला व्हिडीओ 21 फेब्रुवारी  सायंकाळी 5 वाजेपर्यंत 'सारथी'च्या लिंकवर अपलोड करायचा आहे.

अंध मुला-मुलींसोबत शिवजयंती…  

'शिवशक्ती प्रतिष्ठान' च्या वतीने हणबरवाडी संचलित अंध युवक मंच या वसतिगृहातील निराधार अंध मुला-मुलींसोबत शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तर्फे अभिवादन 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात येणार आहे. 19 रोजी सकाळी 11 वाजता, हुतात्मा पार्क येथे शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन व मुस्लिम ब्रिगेडच्या बोर्डाचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री जाधव व जाहिदा खान यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ब्रिगेडचे अध्यक्ष फिरोज खान उस्ताद यांनी दिली.

SCROLL FOR NEXT