कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय मुलीचा बालविवाह अवनिच्या जागर प्रकल्पांतर्गत उघडकीस आला आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी नात्यातील 21 वर्षीय मुलासोबत पीडित मुलीचा विवाह लॉकडाऊन काळात झाला होता.
मुलीच्या जन्म दाखल्याच्या पुराव्यावरून मुलीचे वय सध्या 14 वर्षे 2 महिने असल्याचे स्पष्ट होते. ही माहिती मिळताच जिल्हा बाल कल्याण समितीसमोर मुलगी आणि तिच्या पालकांना हजर केले असता संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महिनाभरापूर्वी याच गावात झालेल्या बालविवाहांचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल आहे.
दरम्यान, गावात बालविवाह झाल्याची माहिती मिळताच ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा सेविका व ग्रामसेवक यांना घेऊन संबंधित अल्पवयीन मुलीच्या व मुलाच्या घरी भेट देण्यात आली. चौकशीअंती बालविवाह झाल्याचे पालकांनी मान्य केले. त्यानंतर मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. पुढील कारवाईपर्यंत समितीने मुलीला काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बालगृहात दाखल करून घेतले आहे.
यासाठी जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अनिता अथने, पर्यवेक्षिका सुवर्णा मस्के व ग्रामविकास अधिकारी बशीर मुजावर यांनी परिश्रम घेतले. यासाठी बालकल्याण समिती अध्यक्ष व सदस्य पद्मजा गारे यांचे सहकार्य लाभले.