कोल्हापूर : देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत; परंतु निधीअभावी या उद्योगाला अपेक्षित भरारी मिळू शकली नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात क्लस्टरची घोषणा करण्यात आली असून यातून या उद्योगाला बूस्टर मिळेल. त्याचबरोबर याचे संपूर्ण संचलन महिलांकडून करण्यात येणार असल्यामुळे महिलांच्या कार्यकुशलतेला संधी मिळणार आहे. महिला बचत गटांना याचा मोठा फायदा होणार आहे.
कोल्हापूरची कुस्ती, गूळ, मर्दानी खेळ आणि कोल्हापुरी चप्पल याची ख्याती सर्वदूर आहे. मर्दानी बाज असलेल्या कोल्हापुरी चप्पलला तर संपूर्ण जगभर मागणी आहे. आकर्षक, देखणेपणा व रुबाब वाढविणार्या कोल्हापुरी चप्पला टिकाऊपणा हे एक वैशिष्ट्य आहे. रशिया, जपान बेल्जियम, लंडन, ऑस्ट्रेलिया, न्यूयार्क, सिडनी आदी देशांमध्ये कोल्हापुरी चप्पलला विशेष मागणी आहे.
चप्पल व्यवसायामध्ये साधारणपणे 4 हजारहून अधिक कारागीर आहेत. कोल्हापूरशिवाय सांगली व कर्नाटकातील काही भागात कोल्हापुरी चप्पलचे उत्पादन घेतले जाते; परंतु जिल्ह्याबाहेर जरी कोल्हापुरी चप्पलचे उत्पादन झाले तरी त्याच्या विक्रीसाठी त्यांना कोल्हापूरच्या बाजारपेठेवरच अवलंबून राहावे लागते. कारण त्याची मुख्य बाजारपेठ ही कोल्हापूरच आहे. असे असले तरी हा व्यवसाय संघटित नसल्यामुळे या उद्योगाच्या वाढीसाठी किंवा विक्रीच्या प्रभावी व्यवस्थेसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय मर्यादितच राहिला.
आता मात्र शासनाने त्याला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्याकरिता क्लस्टर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या उद्योगाला आता चालना मिळणार आहे. त्याच बरोबर महिला बचत गटाच्या चळवळीला आणखी गती मिळणार आहे.