कोल्हापूर

कोल्हापुरातील पुलांच्या मजबुतीकरणासाठी हवेत ३ कोटी

मोहन कारंडे

कोल्हापूर : सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील ब्रिटिशकालीन पुलांचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. यात येथील १० पुलांचा समावेश आहे. मुंबईतील कंपनीकडून महापालिकेने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. त्यानुसार पुलांच्या मजबुतीकरणासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून, तीन कोटी पाच लाखांची आवश्यकता आहे. संपूर्ण कोल्हापूर शहराला जोडणारे हे पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर शहराला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आले. त्या काळात शहरात वाहतूक मर्यादित होती. कालांतराने नागरिकीकरणात वाढ होत गेली. सद्य:स्थितीत शहरात पाच लाखांवर वाहनांची संख्या आहे. शहरातील जुन्या पुलांवरूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. गेल्या अनेक वर्षांपासून पुलांवर वाहनांचा बोजा पडत आहे; परंतु त्याची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याचे वास्तव आहे. काही पुलांचे दगड निखळले आहेत, तर काहींचे दगड तुटलेले आहेत. स्लॅबला भेगा पडल्या असून, सळ्या दिसत आहेत. परिणामी या पुलांचे मजबुतीकरण होणे ही काळाची गरज आहे.

दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर या रस्त्यावर असलेला शाहू पूल हा कोल्हापुरातील पहिला पूल आहे. त्याचे १८७५ साली बांधकाम झाले असून, पुलाची लांबी १२७ फूट आणि रुंदी २१ फूट आहे. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १८७६ मध्ये जयंती नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाची लांबी ९१ फूट आणि रुंदी ३१ फूट आहे. सन १८७९ मध्ये उमा टॉकीज ते पार्वती टॉकीज या रस्त्यावरील रविवार पुलाची बांधणी करण्यात आली. या पुलाची लांबी १०३ फूट आणि रुंदी २४ – फूट आहे. लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे असलेल्या विल्सन पुलाचे १९२७ सालात बांधकाम झाले. या पुलाची लांबी ८७ फूट आणि रुंदी २१ फूट इतकी आहे.

स्वातंत्र्यानंतर सन १९५३ मध्ये कोल्हापूर शहरात एकाच वर्षात चार पुलांची उभारणी करण्यात आली. हुतात्मा पार्क दक्षिण बाजूकडील 1 नवीन पूल क्र. १ हा पूल ७३ फूट लांबीचा असून, १५.५ फूट रुंदीचा आहे. नवीन पूल क्र. २ हुतात्मा १ पार्क उत्तर बाजूच्या पुलाची लांबी ४४ फूट आणि रुंदी १३.५ फूट आहे. नवीन पूल क्र. २ हा हुतात्मा पार्क दक्षिण बाजूला असून, त्याची लांबी ७३ फूट आणि रुंदी १५.५ फूट आहे. नवीन पूल क्र. २ हुतात्मा पार्क उत्तर बाजूचा पूल ४४ फूट लांबीचा आणि १३.५ फूट रुंदीचा आहे. सन १९७० मध्ये लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे संभाजी पूल बांधण्यात आला. त्याची लांबी ३८ फूट आणि रुंदी २१ फूट आहे. कोल्हापूर ते फुलेवाडी असे जोडणारा पूलही फुलेवाडीजवळ बांधण्यात आला आहे. त्याची लांबी ४७ फूट आणि रुंदी ३१ फूट इतकी आहे.

शहरातील पूल व मजबुतीकरणासाठी येणारा खर्च

  • विल्सन पूल – ७,२९,३३०रु.
  • संभाजी पूल – १८,७८, ४५५ रु.
  • जयंती नाला पूल – ८,२८,२४० रु.
  • शाहू पूल – १८,८५,०७२रु.
  • नवीन पूल क्र. १ – २४,९९,९७०रु.
  • नवीन पूल क्र. २ – ११,५०,०२३रु.
  • रविवार पूल – २७,५४,८३९रु.
  • नवीन पूल क्र. २ – १७,१४,६०५ रु.
  • नवीन पूल क्र. २ – १५,२३,७१०रु.
  • फुलेवाडी रिंगरोड – १७,१८,९१०रु.

कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या सर्वच पुलांचे मुंबईतील कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. संबंधित कंपनीच्या अहवालानुसार शहरातील १० पुलांचे जतन, संवर्धन आणि मजबुतीकरण होणे आवश्यक आहे. महापालिकेने त्यासंदर्भात ३ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाला निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
– नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता, महापालिका)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT