कोल्हापूर

कोल्हापुरात ढगफुटीसद‍ृश पाऊस

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मंगळवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगफुटीसद‍ृश पाऊस झाला. अवघ्या 30 मिनिटांत 18 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. शहराच्या पूर्वेकडील परिसरात तासभर थैमान घातले.

पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या सात-आठ मिनिटांतच गटारी दुथडी भरून वाहू लागल्या, अनेक रस्त्यांनाच गटारी, नाल्याचे स्वरूप आले. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्याबरोबर वाहून येणारा कचरा, दगड-धोंडे यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचले. त्यातून वाहने पुढे नेताना चालकांना कसरतच करावी लागत होती. परीख पुलाखालीही पाणी साचले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर या ठिकाणी वाहून आलेल्या दगड-धोंड्यांमुळे वाहतुकीला अडथळे येत होते. काही नागरिकांनी ते बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जिल्हाधिकारी कार्यालय, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरी, ताराराणी चौक, सीपीआर चौक आदी परिसरात पाणी साचले होते. शहरातील मैदानांनाही तळ्याचे स्वरूप आले होते.

पावसाने कळंबा तलावाच्या सांडव्यावरून वाहणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले. काही वेळातच जयंती नालाही ओसंडून वाहू लागला. बाजारपेठा, बसस्थानक, अंबाबाई मंदिर आदी ठिकाणी नागरिकांची, व्यापारी, विक्रेत्यांची पावसाने धांदल उडाली. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची या पावसामुळे धावपळ उडाली.

उजळाईवाडी परिसराला झोडपले

शहरानजीकच्या उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मणेर मळा आदी परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसाने उजळाईवाडीच्या धबधब्याला रौद्ररूप आले. विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावरही पाणी आले. या परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते जलमय झाले, ठिकठिकाणी अर्धा ते एक फूट पाणी साचले. जोरदार पावसाने हैदराबाद-कोल्हापूर विमानालाही आकाशात अर्धा तास घिरट्या माराव्या लागल्या.

SCROLL FOR NEXT