कोल्हापूर/उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगची सुविधा आता द़ृष्टिक्षेपात आली आहे. नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक घटकांची 'डीजीसीए'च्या पथकाकडून मंगळवारपासून पाहणी सुरू करण्यात आली आहे. आणखी तीन दिवस हे पथक पाहणी करून हे पथक अहवाल सादर करणार आहे.
जूनअखेरपर्यंत नाईट लँडिंगची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. येथून चार वर्षांपासून प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर सध्या तीन राज्यांच्या राजधानीशी हवाई मार्गाने जोडलेले आहे. यासह अन्य मार्गांवरील खंडित सेवा पूर्ववत होत आहे. त्याचबरोबर नव्या मार्गावरही विमानसेवेसाठी मोठी संधी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विमानतळाचे विस्तारीकरण सुरू आहे.
विस्तारीकरणाबरोबरच नाईट लँडिंग सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता विमानतळ प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. विमानतळाची सध्याची 1 हजार 370 मीटर धावपट्टी ही 1 हजार 890 मीटरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी अस्तित्वात असलेल्या 1 हजार 370 मीटर धावपट्टीपर्यंत का होईना, नाईट लँडिंगची सुविधा द्यावी, अशी मागणी होती. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबता प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्तांनी दिला होता. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांनीही याबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर 'डीजीसीए'च्या संचालन विभागाच्या संचालक सुमित्रा सक्सेना, उपसंचालक मुकेश वर्मा, सहाय्यक उपसंचालक गौरव फाटक यांच्या या पथकाने रात्री सव्वा आठ वाजल्यापासून विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी सुरू केली. सुरुवातीला विमानतळ संचालक कमल कटारीया व अधिकार्यांकडून पथकाने माहिती घेतली. त्यांच्यासमवेत पथकाने विस्तारीत धावपट्टी, अॅप्रन आणि अॅप्रन वे सह तेथे बसविण्यात आलेल्या विद्युत दिव्यांची पाहणी केली. दिव्यांतील अंतर, नेमके स्थान, त्याची प्रखरता, त्याचे आकारमान आदी छोट्या-छोट्या बाबींची तपासणी करण्यात आली. त्यांनी विमानतळाच्या विद्युत विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. सुमारे सव्वा तास ही पाहणी सुरू होती. बुधवारी सकाळी दहा वाजता पुन्हा पाहणी सुरू होईल. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर होईल, यानंतर नाईट लँडींगच्या सुविधेचा निर्णय होईल. यापूर्वी सूचवण्यात आलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता विमानतळ प्रशासनाने केली आहे.
लाल, निळ्या, पिवळ्या दिव्यांनी परिसर उजळला
तपासणीसाठी धावपट्टीवर बसविण्यात आलेल्या सर्व लाईटस् सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे धावपट्टी लाल, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगातील प्रकाशझोताने अक्षरश: उजळून गेली होती. परिसरातीलही अन्य लाईटस् सुरू केल्याने विमानतळाचा परिसरच उजळला होता.