कोल्हापूर ; एकनाथ नाईक : कोरोना संसर्गाने हाहाकार उडविला आहे. लसीकरण हाच एकमेव बचावाचा पर्याय आपल्या समोर आहे. जानेवारी 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरुवात झाली. शासकीय रुग्णालयांत मोफत केले जाणारे लसीकरण तुटपुंजे पडले. याचाच फायदा घेत खासगी लसीकरण केंद्रांवर 'खासगी'त लसीचा बाजार सुरू केला आहे.
लसीसाठी नागरिकांना 1500 ते 2000 रुपये किंमत मोजावी लागत आहे. विशेष म्हणजे लसीसाठी दिलेल्या पैशाची पावतीही मिळत नाही, असा प्रकार सुरू आहे.
आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 106 खासगी रुग्णालयांत लसीकरणास परवानगी दिली आहे. शहरातील 12 सेंटरवर कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.
शासकीय रुग्णालयात ही लस मोफत दिली जाते. मागणीच्या प्रमाणात येथे लस उपलब्ध होत नसल्याने पहाटेपासून रांगा लागलेल्या असतात. काही केंद्रांवर दुसर्या डोसला प्राधान्य दिल्याने पहिल्या डोससाठी रुग्णालयांच्या पायर्या झिजवाव्या लागत आहेत.
पैसे देऊन अनेक नागरिक लस घेण्यास तयार आहेत. पण येथेही त्यासाठी चढ्यावर उड्या आहेत. याचा फायदा घेऊन 'खासगी'त शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेऊन लस दिली जात आहे.
एका व्हाईलमध्ये .5 एमएल इतकी लस असते. दहा नागरिकांना ती दिली जाते. खासगी रुग्णालयांत ऑन दि स्पॉट नोंदणी करून घेऊन लस दिली जाते. 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाते.
जिल्ह्यात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुत्निकचे लसीकरण सुरू आहे. या व्हॅक्सिनच्या किमती कंपनीनिहाय भिन्न आहेत. पण नर्सेस चार्जेस, हॉस्पिटल चार्जेस, सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली 'खासगी'त हात धुऊन घेतले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतोय, लस घ्या.नाहीतर परत लवकर मिळणार नाही, असेही सांगून नागरिकांच्या खिशातील पैसे कसे काढायचे हे केंद्रांना नवीन नाही. कोरोना संसर्गाच्या धास्तीने अव्वाच्या सव्वा पैसे देऊन नागरिक लसीकरण करून घेत आहेत.
शासकीय दरानुसार लसीकरणाचे पैसे खासगी रुग्णालयातील केंद्रावर घेणे अपेक्षित आहे. तरी देखील खासगीत लसचा 'बाजार' करणर्या केंद्रावर जिल्हा प्रशासनाचा चाप हवाच, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
कोरोना संसर्गात अनेकांनी आपले हात धुऊन घेतले आहेत. लसीकरणाच्या बाबतीत असाच प्रकार खासगी लसीकरण केंद्रांत सुरू आहे. 'खास' व्यक्तीकडून गेल्यास खासगीत 'खास' लस मिळते. अशा प्रकारे एजंटांची साखळी फोफावली असून त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
[visual_portfolio id="7577"]