कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रांगड्या कुस्ती परंपरेला 15 हजार वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे या परंपरेतील योगदान मोठे आहे. तर राजर्षी शाहूंच्या कोल्हापुराने ही परंपरा विकसित केली. मात्र, आज शंभर वर्षांनंतर कोल्हापूरची ओळख असणारी ही कुस्ती दुर्मीळ होत चालली आहे. कुस्तीच्या जतन-संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे अत्यावशक आहे, असे प्रतिपादन 'नाबार्ड'चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी केले. इतकेच नव्हे, तर या कामाची सुरुवात म्हणून 50 हजारांच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.
कलाशिक्षक मिलिंद यादव लिखित 'पहिले ऑलिम्पिकवीर पै. दिनकरराव शिंदे' या पुस्तकाचे प्रकाशन व त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा सोहळा गुरुवारी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ येथे, डॉ. थोरात यांच्या हस्ते व शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंह, दिनकरराव शिंदे यांचे चिरंजीव शरद शिंदे, अॅड. अशोकराव साळोखे, अजित राऊत, महेश जाधव, अजित खराडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पैलवान दत्तक घेण्याचे आवाहन
थोरात यांनी, वस्ताद दिनकरराव शिंदे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी स्वहितापेक्षा समाज घडविला. केवळ तालीम उभारली नाही, तर शिवाजी पेठ घडविली, असे सांगितले. अशा या महान मल्लाचा आणि कुस्ती परंपरेचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक कोल्हापूरकराने यथाशक्ती योगदान द्यावे. शाहू महाराज यांनी कुस्तीच्या जतनासाठी आपण सर्वांसोबत सदैव सक्रिय राहू, अशी ग्वाही दिली.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी, हे पुस्तक संशोधनात्मक ग्रंथ असून तरुण पिढीला विचार देणारा आहे. हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी कोल्हापूरच्या दानशूर लोकांनी शिंदे कुटुंबीयांना यथाशक्ती मदतीचे पाठबळ देण्याचे आवाहन केले. लेखक मिलिंद यादव यांनी, दिनकरराव शिंदे यांच्या दुर्लक्षित; पण समाजोपयोगी कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी स्वागत, कॉ. चंद्रकांत यादव यांनी प्रास्ताविक, प्रा. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन, तर लालासोा गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. शिवशाहीर दिलीप सावंत, तृप्ती सावंत, मिलिंद सावंत व पथकाने पै. दिनकरराव शिंदे यांच्यावर आधारित पोवाडे सादर केले. चित्रकार राहुल सुतार यांचा विशेष सत्कार यावेळी झाला.
दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन
पुस्तक प्रकाशनानिमित्त वस्ताद दिनकरराव शिंदे यांच्याशी संबंधित विविध दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.