कोल्हापूर

कामाला लागा; उद्धव यांचा क्षीरसागर यांना आदेश

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. 'कोल्हापूर उत्तर'ची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. आपला शत्रू हा भाजप असून, भाजपला रोखण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना दिले. या भेटीनंतर क्षीरसागर यांनी आपली कोणतीही नाराजी
नसून, पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असल्याचेे सांगितले. त्यामुळे काँगेसचा जीव भांड्यात पडला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झालेल्या राजेश क्षीरसागर यांचा 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला. जाधव यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. क्षीरसागर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तसेच मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो प्रस्तावही पक्षाने फेटाळला. काही शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला बोलावले.

सोमवारी दुपारी 'वर्षा' निवासस्थानी क्षीरसागर आणि पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. अशावेळी महाविकास आघाडी एकसंधपणे त्यांचा मुकाबला करीत आहे. कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे ती काँग्रेसकडे गेली आहे. आता महाविकास आघाडी म्हणून आपल्याला आघाडी धर्म पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नाराजी न बाळगता ही जागा कशी जिंकता येईल, यासाठी कामाला लागा आणि दणदणीत विजय मिळवा, असे आदेश दिले.

या भेटीनंतर क्षीरसागर यांनी आपल्याकडे असलेली जागा लढता येत नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना होती. मात्र, आता कोणाचीही नाराजी नसून, ही जागा जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. त्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर, संजय पवार उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT