कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार्या टिप्परचालकांनी शनिवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन केले. खासगी ठेकेदार असलेल्या डी. एम. कंपनीने दोन महिने पगार दिला नसल्याने संतापलेल्या चालकांनी झूम प्रकल्प परिसरातच वाहने थांबविली. महापालिका अधिकार्यांनी काम सुरू करण्याची केलेली विनंती चालकांनी धुडकावली. ठेकेदार कंपनीचे कोणीही आंदोलनस्थळी फिरकले नाही. अखेर चालकांनी सर्व टिप्पर वाहने बुद्ध गार्डन येथे वर्कशॉपमध्ये जमा केली. परिणामी, कोल्हापुरातील तब्बल दोनशे टन कचरा उठाव ठप्प झाला.
मनपाकडून 14,700 अन् चालकांच्या हातात 8 हजार
शहरातील कचरा उठाव टिप्पर वाहनांद्वारे केला जातो. त्यासाठी महापालिकेने टिप्पर वाहने खरेदी केली आहेत. डी. एम. कंपनीकडून 107 चालक घेण्यात आले आहेत. महापालिका प्रत्येक चालकामागे 14 हजार 700 रुपये डी. एम. कंपनीला देते. परंतु, संबंधित कंपनी चालकांना 8 हजार रु. देत असल्याची चालकांची तक्रार आहे. हा पगारही वेळेवर दिला जात नसल्याने गेल्या सहा महिन्यांत चालकांनी अनेकवेळा काम बंद आंदोलने केली आहेत. कंपनीच्या वतीने भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरली जात नसल्याचे चालकांनी सांगितले.
डेबीट पडत असल्याने फक्त वाहने बाहेर काढली
चालकांनी काम बंद आंदोलन करून डेपोतून टिप्पर वाहने बाहेर काढली. वाहने बाहेर न काढल्यास त्यांच्यावर दिवसाला 750 रु. डेबीट लावले जाते. चालकांच्या पगारातून डी. एम. कंपनी ही रक्कम कपात करून घेते. त्यामुळे सर्व चालकांनी शनिवारी सकाळी टिप्पर वाहने डेपोतून बाहेर काढली. भागातून फिरून लाईन बाजारमधील कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्व चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले. महापालिका अधिकार्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुपारपर्यंत या ठिकाणी वाहने थांबून होती. त्यानंतर वाहने डेपोत जमा करून चालक निघून गेले.
शहरात टिप्पर वाहनांद्वारे कचरा उचलण्यासाठी डी. एम. एंटरप्रायजेस कंपनीकडून 104 चालक घेतले आहेत. डी. एम. कंपनीच्या चालकांनी शनिवारी सकाळी अचानक पगारासाठी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे डी. एम. कंपनीला नोटीस बजावली आहे. यापूर्वीही चालकांनी आंदोलन केले होते, त्यावेळी कंपनीकडून एक दिवसाची रक्कम कपात करून घेतली होती. आताही तशीच कारवाई करण्यात येईल.
– रविकांत आडसूळ, उपायुक्त
पालकमंत्री पाटील यांच्या आदेशालाही कोलदांडा
पगारासाठी टिप्परचालक वारंवार आंदोलन करतात. परिणामी, शहरातील कचरा उठाव ठप्प होऊन नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एक तर टिप्परचालक दिवसाआड कचरा गोळा करण्यासाठी येतात. त्यातही आंदोलन झाले, तर दोन-चार दिवसांचे अंतर पडते. टिप्परचालकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गार्हाणे मांडले होते. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेऊन डी. एम. कंपनीच्या प्रतिनिधींना चालकांना किमान 12 हजार रुपये पगार देण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतुु, पालकमंत्री पाटील यांच्या आदेशालाही डी. एम. कंपनीने कोलदांडा लावल्याचे चालकांनी सांगितले.