कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त एचआयव्हीसह जगणार्या व्यक्तींसाठी रविवारी विवाह परिचय मेळावा संपन्न झाला. येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे एनकेपीप्लस विहान संस्थेतर्फे व दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला होता. दै.'पुढारी'चे पुरवणी संपादक जयसिंग पाटील अध्यक्षस्थानी, तर अॅड. दीपक पाटील, पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके, डॉ. ऋतुजा कदम, 'विहान'च्या अध्यक्षा वैशाली बगाडे प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, सोलापूरसह कोकण विभागातील विवाह इच्छुकांनी उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी बोलताना जयसिंग पाटील म्हणाले, 'एचआयव्हीसह जगणार्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी कृतिशील उपक्रम राबविणे आवश्यक आहे. विवाह परिचय मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना जगण्याची नवी दिशा व उमेद मिळेल.'
अॅड. दीपक पाटील म्हणाले, 'एड्स निर्मूलन व नियंत्रण कायदा 2017 मध्ये एचआयव्हीबाधित रुग्ण असे संबोधले नसून 'प्रोटेक्टेड पर्सन' असे संबोधले आहे. या कायद्यामध्ये विवाहाला बाधा येईल अशी एकही तरतूद नाही. भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल 21 प्रमाणे सर्वांना जगण्याचा मूलभूत अधिकार मिळाला असून, यामध्ये विवाहाच्या अधिकाराचादेखील समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपापल्या धर्माला लागू असणार्या कायद्याप्रमाणे किंवा विशेष विवाह कायद्याप्रमाणे विवाह करू शकतो.
कार्यक्रमास शैलेंद्र कुरणे, गणेश शिंदे, दीपक भोसले उपस्थित होते. विक्रम रेपे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संजय साऊळ यांनी आभार
मानले.
दै. 'पुढारी'चे सातत्याने पाठबळ
एचआयव्हीबाधितांसाठी दिवाळीनिमित्त 'एक पणती माणुसकीची', शालेय मुलांसाठी राधानगरी-दाजीपूर सफर यांसह दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात. याबद्दल 'विहान'च्या अध्यक्षा वैशाली बगाडे यांनी दै. 'पुढारी'चे आभार मानले.