कोल्हापूर

एक गाव – एक गणपती संकल्पनेला बळ!

Arun Patil

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : महापुराचे संकट… कोरोनाचे सावट… मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लागोपाठ संकटांच्या मालिका सुरूच आहेत. अशा संकटांमध्ये सण-उत्सवांमधून काहीसे बळ मिळते. गणेशोत्सवामध्ये गावांत एकीचे बळ दिसावे, तसेच सामाजिक उपक्रमांना बळ मिळावे यासाठी पोलिसांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात 'एक गाव – एक गणपती' संकल्पनेला बळ मिळत आहे. यंदा 292 गावांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात सुमारे 7600 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गणेश आगमन मिरवणुकांवर मागील दोन वर्षांपासून बंदी आहेच. ग्रामीण भागात पाच दिवसांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन सुरू होते. शहरात दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होतो. कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक ही मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत गणली जाते. परंतु 2019 चा महापूर, त्यानंतर आलेल्या कोरोना संकटाने यावर मर्यादा आल्या आहेत.

गावाची एकी पुन्हा दिसणार

कोरोना काळात गावामध्ये कोव्हिड सेंटर उभारणे, रुग्णाच्या कुटुंबाला मदत देणे, गावात येणार्‍या तसेच बाहेर जाणार्‍यांची चौकशी, कोरोना रोखण्याच्या उपाययोजना यामुळे गावातील गट-तट विसरून सर्वजण कामाला लागले होते. गणेशोत्सवाच्या निमित्तानेही ही एकी अशीच टिकवून ठेवण्यासाठी 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना कामी येणार आहे. विघ्नहर्त्या गणेशाच्या आशीर्वादाने गावाची ही एकी कायम टिकून राहण्यासाठी पाठबळ मिळेल, यात शंका नाही.

जिल्ह्यातील 292 गावांनी 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेचा स्वीकार केला आहे. शहरातील पेठांमध्ये मुख्य तालीम संस्थांचे गणेशोत्सवही व्यापक स्वरूपात असतात. त्या भागातील लहान मंडळे या तालीम संस्थेच्या गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होताना दिसून येतात.

गणेशोत्सव हा एक प्रमुख सण आहे. गणेशाच्या आगमनाने नवी ऊर्जा व चैतन्य मिळते. पण कोरोनाचे संकट असताना मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. गणेशोत्सव मंडळांनी या वर्गणीतून कोव्हिड सेंटर, रुग्णांना मदत, महापुराने नुकसान झालेल्या गावांचे पुनर्वसन असे उपक्रम राबविल्यास गणरायाची खरी सेवा होणार आहे.
– शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT