कोल्हापूर

उत्तूरजवळ अपघातात सत्तावीस जखमी

दिनेश चोरगे

उत्तूर; पुढारी वृत्तसेवा :  गडहिंग्लजहून गारगोटीला जाणारी एसटी बस (एमएच 14 बीटी 0323) व निपाणीकडे जाणारा टेम्पो (एमएच 11 सीएच 2461) यांचा उत्तूरजवळ अपघातात झाला. यामध्ये 27 प्रवासी जखमी झाले. यातील 14 जणांवर उपचार करण्यात आले. काही जखमींना गडहिंग्लज येथील खासगी व उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. टेम्पोमधील चालकाची माहिती कळाली नाही. हा अपघात उत्तूर-गडहिंग्लज रोडवरील बामणे यांच्या घरासमोर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघाताबाबत एसटी बसचालक माणिक राजिगरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे समोरून येणारा टेम्पो रस्त्याकडेला असणार्‍या दगडावरून उलटून पुन्हा डावीकडे रस्त्यावर पडला. या दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान राखत व दुसर्‍या बाजूला खड्डा असल्याने चालकाने एसटी बस झाडावर घातली. बसमध्ये 45 प्रवासी होते. त्यात महाविद्यालयीन मुले-मुली अधिक होती. जखमींना गडहिंग्लज येथे नेण्यासाठी व उपचार झालेल्यांना गावी पाठविण्यासाठी मुकुंदराव आपटे फाऊंडेशनने रुग्णवाहिकेची सोय केली. उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनी यावेळी सहकार्य केले. घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

SCROLL FOR NEXT