इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीतील व्यापार्याला फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकवून व ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शीतल मोरे, मंगल शिवानंद हाजिंगे, शिवानंद हाजिंगे, बबलू हाजिंगे (सर्व रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर) व रियाज मुल्ला (रा. सोलगे मळा) या पाच संशयितांना अटक केली आहे. इचलकरंजी व हातकणंगले येथे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी संबंधित व्यापार्याने फिर्याद दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली.
इचलकरंजी शहरातील एका प्रथितयश व्यापार्याची फेसबुकच्या माध्यमातून शीतल मोरे या महिलेशी ओळख झाली. दोन वर्षे त्यांच्यात संवाद सुरू होता. 29 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता एकांतात भेटायचे आहे, असे सांगून संशयित महिलेने या व्यापार्याला हातकणंगले येथे अन्नपूर्णा हॉटेल येथे बोलावले. काही वेळातच मंगल हाजिंगे, शिवानंद हाजिंगे, बबलू हाजिंगे व रियाज मुल्ला हे संशयितही त्याठिकाणी आले. त्यांनी व्यापार्याला दमदाटी केली. संबंधित महिलेशी प्रेमसंबंध ठेवून तिची देखभाल कर, घरी घेऊन जा किंवा महिन्याला तिला खर्चासाठी पैसे दे, असे सांगून पोलिस ठाण्यात तक्रार देईन आणि घरी येऊन बदनामी करू, अशी धमकी दिली.
व्यापार्याकडे सात लाखांची मागणी केली. संशयितांनी तडजोडीनंतर चार लाख रुपये घेण्याचे कबूल केले. त्यापैकी अडीच लाख रुपये उकळण्यात आले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यामुळे घाबरलेल्या व्यापार्याने बुधवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने पाचही संशयितांना गजाआड केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहेत.