कोल्हापूर

इचलकरंजीत दुचाकींची धडक; एक ठार

backup backup

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुचाकीने दुसर्‍या दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. बसाप्पा संगाप्पा बिदरगड्डी (वय 45, रा. रत्नदीप वसाहत, कबनूर) असे मृताचे नाव आहे. विरुपाक्ष बसाप्पा कोष्टी (वय 41) व फिरोज रुकमुद्दीन पेंढारी (वय 38, दोघे रा. कोरोची) हे दोघे जखमी झाले. पंचगंगा नदी पुलाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात घडला. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

बसाप्पा बिदरगड्डी, पेंढारी व कोष्टी मोटारसायकलवरून शिवनाकवाडी येथे मंगळवारी रात्री जेवणासाठी गेले होते. तेथून ते रात्री 10 च्या सुमारास इचलकरंजीकडे परतत होते. पंचगंगा नदी पुलाजवळ ते आले असता, हुपरीकडे भरधाव जाणार्‍या एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये तिघेही रस्त्यावर आपटले.

अपघातानंतर अनोळखी दुचाकीस्वार मात्र पसार झाला. या अपघातात तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम इंदिरा गांधी रुग्णालयात, तर पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बिदरगड्डी यांचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी पेंढारी यांनी गावभाग पोलिस ठाण्यात दिली आहे. बिदरगड्डी यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघातास कारणीभूत असणार्‍या दुचाकीस्वाराचा शोध पोलिस घेत आहेत.

SCROLL FOR NEXT