इचलकरंजी : विठ्ठल बिरंजे : शेतीला समांतर असलेला यंत्रमाग व्यवसायही अलीकडच्या काळात आतबट्ट्यात येत आहे. कापूस, सूत, कापड दरातील अस्थिरता या उद्योगाच्या मुळावर उठली आहे. मागील दोन सरकारने या उद्योगासाठी ठोस भूमिका घेतली नसल्याने राज्यातील यंत्रमागाचा खडखडाट शांत होण्याच्या वाटेवर आहे.
केंद्र आणि राज्यात सध्या एका विचारांचे सरकार असल्यामुळे मोठ्या अपेक्षेने यंत्रमाग उद्योजक सरकारकडे पाहात आहे. आवश्यक आणि ठोस उपाययोजना करून सरकार उद्योगाला स्थिरता देईल, अशी माफक अपेक्षा यंत्रमागधारकांची आहे. यासाठी एकूणच वस्त्रोद्योगाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीच्या हातात सूत्रे दिल्यास अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सकाळी सुताचे दर वाढलेले असतात तर त्याच सुतापासून तयार झालेल्या कापडाला सायंकाळी उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. त्यामुळे यंत्रमाग चालवायचे कुणासाठी, असा प्रश्न या व्यवसायासमोर आहे.
खर्चीवाला (सुपर लेबर) जगला पाहिजे
यंत्रमाग व्यवसायात सर्वाधिक हाल खर्चीवाला यंत्रमागधारकांचे सुरू आहेत. राज्यात साध्या यंत्रमागापैकी 50 टक्के खर्चीवाले आहेत. हा वर्ग मजुरीवर कापड तयार करून देतो. प्रतिपीक प्रतिमीटर साडेसहा ते सात पैसे उत्पादन खर्च असताना ट्रेडिंग कंपन्यांकडून साडेचार ते साडेपाच रुपये मजुरी दिली जाते. खर्चीवाल्यांना कायद्याचे संरक्षण नसल्यामुळे त्यांची सरकार दरबारी दाद घेतली जात नाही. त्यांना जगवण्यासाठी यंत्रमाग कामगार संरक्षण कायद्याप्रमाणे संरक्षण देण्याची नव्या सरकारकडून अपेक्षा आहे.
साध्या यंत्रमागाला बूस्टची गरज
या व्यवसायात मोठे फेरबदल येत आहेत. अॅटो, रॅपिअर, एअरजेट असे आधुनिक यंत्रमाग आले आहेत. परंतु या व्यवसायाचा पाया असलेल्या साध्या यंत्रमागधारकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इचलकरंजीचा विचार केल्यास 90 हजार तर राज्यात 10 लाख साधे यंत्रमाग आहेत. साध्या यंत्रमागाला वीज दर सवलत, सूत कापड दरात स्थिरता देऊन सावरण्याची गरज आहे.
इंधन अधि'भार'
सध्या वीज बिल आकारताना 27 एचपीखालील यंत्रमागास प्रतियुनिट 3 रुपये अधिक 85 पैसे इंधन अधिभार तर 27 एचपी वरील यंत्रमागास प्रतियुनिट 4.50 रुपये अधिक 1 रुपये इंधन अधिभार लावण्यात आलेला आहे. त्यामुळे यंत्रमागास सवलतीच्या दरातील वीज ही संकल्पनाच फोल ठरली आहे. यावरही सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
…हे महत्त्वाचे
सुताचे दर वर्षभर स्थिर हवेत
उत्पादन खर्चावर कापडाला दर
मजुरी दराला कायदेशीर संरक्षण
महागाई भत्त्यानुसार मजुरी वाढ
27 एचपीखालील यंत्रमागास
प्रतियुनिट 2 रुपये वीज दर
27 एचपीवरील यंत्रमाग युनिटला 3.50 रुपये वीज दर
पोकळ थकबाकी रद्द करावी
5 टक्के व्याज अनुदान
कोणतेही अतिरिक्त दर न लावता वीज दर एकच असावा