इचलकरंजी : संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याखाली गेलेला जुना पूल.  
कोल्हापूर

इचलकरंजी : पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

अमृता चौगुले

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी मध्ये पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली आहे. इचलकरंजी शहर परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.

इचलकरंजीत पंचगंगा नदीची इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गत 24 तासांत पाणीपातळी 5 फुटांनी वाढली तर गुरुवारी दिवसभरात 3 फूट वाढून सायंकाळी ती 63 फुटांवर पोहोचली. त्यामुळे जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. प्रशासनाने नदीकाठ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पंचगंगेची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे.

इचलकरंजी : येथे संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पात्राबाहेर पडलेले
पाणी. (छाया : अनंतसिंग)

गत चार दिवसांपासून शहर परिसरासह जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात आणि विशेषत: कोकण विभागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. परिणामी, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सन 2005 आणि 2019 च्या आठवणींना उजाळा मिळत आहे. पाणीपातळीत होत असलेली वाढ पाहता प्रशासनाने नदीकाठावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

बुधवारी दुपारपासून जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार कायम होती. पंचगंगा नदीचे पाणी पसरत चालल्याने स्मशानभूमीत पाणी शिरले असून नदीकाठावरील श्री वरदविनायक मंदिर, घाटावरील महादेव मंदिर, समाधीस्थळाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात, तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांचा या पथकांत समावेश आहे.

2019 मध्ये कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर होती. पुराच्या पाण्यामुळे करवीर, आंबेवाडी, शिरोळ, कुरुंदवाड येथील हजारो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एनडीआरएफ पथकाला पाचारण केले होते. बोटी तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून या पथकातील जवानांनी पूरग्रस्तांचे स्थलांतरण केले होते. हे पथक पंधरा दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास होते. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या सततच्या संततधारेमुळे जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे.

हे पथक दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. दोन पथकांमध्ये प्रत्येकी 25 जवानांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पथक प्रमुख निरीक्षक बि—जेशकुमार रैकवार, निरीक्षक बलबीरलाल वर्मा, उपनिरीक्षक अजयकुमार यादव यांच्याशी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व मदतकार्याबाबत चर्चा केली. मदतकार्य करताना या पथकाला कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल, असे सांगितले. कोरोना परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेऊन मदतकार्यासाठी पथक सज्ज असल्याचे पथकातील निरीक्षक बि—जेशकुमार रैकवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. यानंतर ही पथक करवीर, शिरोळकडे रवाना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT