कोल्हापूर

इचलकरंजी : 95 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

Arun Patil

इचलकरंजी ; संदीप बिडकर : मृग कोरडा, तर आर्द्रा नक्षत्र संपत आले तरी जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. कधी नव्हे एवढी पावसाने ओढ दिल्यामुळे वळवाच्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे 95 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आहे. यामधील सर्वाधिक फटका भात शेतीला बसला असून, 51 हजार हेक्टरवर पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना पुन्हा बियाण्यांसाठी, खतांसाठी धावपळ करावी लागणार आहे. त्याचबरोबर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पिकांना आवश्यक असणारा पाऊस पडणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज शेतकर्‍यांच्या पोटामध्ये गोळा आणत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या धुवाँधार वळवाचा आधार घेऊन अनेक शेतकर्‍यांनी भात, भुईमूग, सोयाबीन, मका आदींसह कडधान्याची पेरणी केली आहे. यामध्ये भात पिकाची पेरणी तर काही जणांनी धूळफेक पद्धतीने केली. पाऊस जून महिन्यामध्ये पडणारच, असा अंदाज करून पेरण्या पूर्ण केल्या. परंतु, जून संपत आला तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यावर्षी जिल्ह्यातील सुमारे 50 टक्के शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत.

यामध्ये सर्वाधिक क्षेत्र 95 हजार हेक्टर हे भात पिकाचे आहे. परंतु, पावसाचा पत्ता नाही. परिणामी, पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले आहे. पुन्हा शेतीची नांगरट, मशागत करून पेरणी करावी लागते की काय, अशी परिस्थिती सध्या शेतकर्‍यांसमोर उभी ठाकली आहे. पहिल्या पेरणीसाठीच बियाणे, खते जमविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत झाली. त्यात आता दुबार पेरणीचे संकट म्हटल्यावर शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पक्ष्यांकडून पिके नष्ट होण्याचा धोका

खरिपाच्या पिकासाठी अनेक शेतकर्‍यांना पाणी देणे शक्य आहे. परंतु, बहुतांश परिसरातील शेतीतील पिकांची उगवण झाली नाही किंवा पेरले नाही व पाणी देणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील पीक जर उगवून आले, तर चिमण्या व अन्य पक्ष्यांमार्फत पिके नष्ट होण्याचा धोका शेतकर्‍याला असतो. त्यासाठी पीक राखण पद्धत अवलंबावी लागते. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही अनेकजण पाणी देण्यास धजावत नाहीत.

भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्याने पिकाची जोमाने वाढ होणार नाही. त्यामुळे आठवडाभरामध्ये पाऊस झाला नाही तर भाताची दुबार पेरणी करावी लागणार, हे निश्‍चित आहे.
– चंद्रकांत सूर्यवंशी, माजी जिल्हा कृषी विकास अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT