पोर्ले तर्फे ठाणे, पुढारी वृत्तसेवा : आसुर्ले, (ता. पन्हाळा) येथील वारकरी महिला कमल तुकाराम धनगर (वय 55) यांचा पंढरपूर-सांगोला महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीतून पाण्याची चूळ भरीत असताना तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना उदनवाडी ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी (दि.26) सकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेची सांगोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आसुर्ले ते पंढरपूर अशी पायी दिंडीने 20 जून रोजी प्रस्थान केले होते. या दिंडीत कमल धनगर होत्या. सोमवारी सकाळी त्या दिंडी सोबत असणार्या ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून दिंडी सोबत प्रवास करीत होत्या. ट्रॅकटरच्या पुढच्या ट्रॅालीमध्ये बसलेल्या कमल पाण्याची चुळ भरताना त्यांचा तोल गेल्याने दोन्ही ट्रॅालीच्या मध्ये पडल्या.
दोन्ही ट्रॉलीच्या मध्ये असणार्या लोखंडी दांडीवर त्यांचे डोके आपटल्याने त्यांच्या डोक्यात खोलवर जखम झाली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही पायावरून मागील ट्रॅालीचे चाक गेले. त्यांना बेशुद्धावस्थेत सोबत असणार्या वारकर्यांनी उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. डॅाक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच येथील मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या मागे पती, तीन मुली असा परिवार आहे.