कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील किरण पोटे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नजरिया' या अवयवदानविषयी जनजागृती करणार्या हिंदी लघुपटाला देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेते सागर कोरे यांची मुलगी सेजलच्या लघुपटातील प्रमुख भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाने प्रेरित होऊन पोटे यांना अवयव दान ही संकल्पना सूचली. यातूनच नंतर लिखाणाला सुरुवात झाली आणि त्यातून तयार झालेला लघुपट म्हणजे 'नजरिया'. द़ृष्टिहीन असलेल्या मुलांची कहाणी पोटे यांनी लघुपटातून मांडली. या भूमिकेसाठी ते बाल कलाकाराच्या शोधात होते. अनेक ऑडिशनमधून या भूमिकेला न्याय देणार्या निरागस चेहर्याच्या शोधात होते. हा शोध सेजल कोरेपर्यंत येऊन संपला.
लहानपणापासूनच सेजलला अभिनयाची आवड आहे. शाळेतील अनेक कार्यक्रमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे नजरिया या लघुपटाला ती न्याय देईल, ही पोटे यांची अपेक्षा सेजलने सार्थ करून दाखवली. गेल्यावर्षी या लघुपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला. अवघ्या काही महिन्यांत तो पूर्ण झाला. त्यानंतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला. तेव्हा लघुपटाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कथा, पटकथा, संवाद आणि सेजल तसेच अन्य कलाकारांच्या अभिनयाला दाद मिळाली. म्हणूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 13 हून अधिक पुरस्कारांवर या लघुपटाने मोहोर उमटवली.
अभिरूची नाट्य संस्थेच्या माध्यामातून किरण पोटे यांनी अनेक राज्य नाट्य स्पर्धा तसेच एकांकिकेमधून अभिनय केला आहे.2019 साली कल्टी या पहिल्या चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अॅवॉर्ड मिळाला. याचवर्षी उद्यमनगर येथील चिंध्या विकणार्या महिलांवर आधारित तयार केलेल्या चिंध्या या लघुपटाला व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला.
सेजलचे वडील सागर कोरे हे वृत्तपत्र विक्रेते आहेत. मुलीच्या अभिनयाबद्दल होत असलेल्या कौतुकाने तेही भारावून गेले आहेत. सेजल रा. ना.सामाणी हायस्कूल मधून चौथी उत्तीर्ण होऊन सध्या पद्माराजे गल्र्स हायस्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत आहे. सेजलचा हा पहिलाच लघुपट आहे. ही भूमिका साकारताना तिला डोळ्यामध्ये विशिष्ट लेन्सचा वापर करावा लागला. या लघुपटात सेजलबरोबरच कैलाश वाघमारे, प्रमोद शिंदे, मिलिंद ओक, बाजीराव गवळी, मारुती माळी, योगेश सोमण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.