शिरटी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पूरस्थिती २०१९ पेक्षा भयानक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी विकास खरात यांनी घालवाड, अर्जुनवाड यासह अन्य ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान प्रांताधिकारी खरात म्हणाले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे २०१९ पेक्षा भयावह परिस्थिती होण्याची शक्यता असून नागरिकांनी वेळीच धोका ओळखून जनावरांसाहित सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन खरात यांनी केले.
यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवीतके, मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी, यासह सर्व ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यासह ग्रामस्थ उपस्थित होते.