कोल्हापूर

अभ्यास करून गुणवत्ता प्राप्त करा : अभिनेते भरत जाधव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै.'पुढारी' टोमॅटो एफ.एम.च्या वतीने बालदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या 'आनंदाने वाचू या' उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. वाचन संस्कृती रुजविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून गुणवत्ता प्राप्त करावी, असे प्रतिपादन सिनेअभिनेते भरत जाधव यांनी केले.

सदर बाजार येथील म.न.पा. सद्गुरू गाडगे महाराज विद्या मंदिर शाळेस टोमॅटो एफ.एम. आणि श्रोत्यांनी दान स्वरूपात देलेली नवीन, जुनी पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टोमॅटो एफ.एम.च्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. स्मितादेवी योगेश जाधव होत्या.

जाधव म्हणाले, आता पुस्तके मिळाली आहेत. त्यांचे वाचन करा. अभ्यासाचे महत्त्व वाढले असून गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. मोबाईल, टीव्हीमुळे मुलांचे वाचन कमी होत चालले आहे. अशा काळात टोमॅटो एफ.एम.ने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शाळांना पुस्तके भेट देण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.

मुख्याध्यापक महेश ठोंबरे म्हणाले, 'आनंदाने वाचू या' उपक्रम स्तुत्य आहे. शाळेला दिलेल्या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. रोज नवनवीन पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यास मदत होईल.

यावेळी टोमॅटो एफ.एम. स्टेशनचे प्रमुख विद्यासागर अध्यापक, शिक्षक राजेंद्र कुंभार, गीता घाटगे, रेश्मा मुजावर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रशिदा शेख, दशरथ कांबळे, सुशीला विभुते, टोमॅटो एफ.एम.चे आरजे, सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन आरजे रसिका कुलकर्णी यांनी केले. तर आभार विश्वराज जोशी यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT