कोल्हापूर

अंबाबाई मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंड विकासाच्या प्रतीक्षेत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; सागर यादव :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील कालौघात पूर्णपणे मुजविण्यात आलेले ऐतिहासिक मणकर्णिका कुंड पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने खुले करण्यात आले आहे. कुंडाच्या दगडी पायर्‍या व सभोवतालच्या ओवर्‍यांसाठीचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ती मिळाल्यानंतर या कुंडाचा विकास होणार आहे.

अंबाबाई मंदिराच्या उत्तरेकडील घाटी दरवाजाजवळ असणारे मणकर्णिका कुंड काही दशकांपूर्वी धोकादायक असल्याने बुजविण्यात आले होते. कुंडाच्या जागेवर बगीचा व स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती. बाहेरील बाजूस फुलांची दुकानेही झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून मंदिर परिसराच्या विकासाची कामे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून पूर्णपणे बुजविण्यात आलेले मणकर्णिका कुंड पूर्ववत खुले करण्यात आले. या उत्खननात मंदिर स्थापत्याचा भाग असणारे पाण्याचे दगडी कुंड, दगडी पायर्‍या, ओहर्‍याचे अवशेष यासह वीरगळ, शिवलिंग, दगडी खांब असे अवशेष आढळले आहेत. या सर्व अवशेषांचे जतन-संवर्धन देवस्थान समितीने केले आहे.

कुंडाचे स्थापत्य, सौंदर्य पूर्ववत करण्यावर भर

मणकर्णिका कुंडाच्या विकासाचा पुढील टप्पा म्हणून कुंडाचे स्थापत्य, सौंदर्य पूर्ववत करण्यावर भर असणार आहे. कुंडाच्या दगडी पायर्‍या, ओवर्‍या पूर्ववत उभारण्याचा देवस्थान समितीचा मानस आहे. यासाठीचे प्रस्ताव समितीने पुरातत्त्व विभागाकडे पाठवले आहेत. याला मंजुरी मिळताच कामांना सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात कुंडाच्या पायर्‍या व नंतर ओवर्‍या उभारण्यात येणार आहेत. उत्खननात मिळालेल्या दगडांचा पूर्ववत वापर करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT