ZP Panchayat Election | झेडपी, पंचायत समितीसाठी प्रतिष्ठा पणाला; शनिवारी मतदान  
कोल्हापूर

ZP Panchayat Election | झेडपी, पंचायत समितीसाठी प्रतिष्ठा पणाला; शनिवारी मतदान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यासह स्थानिक वर्चस्वासाठी नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, आरोप-प्रत्यारोपाने गावागावांत टोकाला गेलेली ईर्ष्या आणि त्यातून अटीतटीच्या होत असलेल्या लढती, अशा वातावरणात मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेसह 12 पंचायत समितीसाठी शनिवारी चुरशीने मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 23 लाख 40 हजार 199 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी निवडणूक लढवत असलेल्या 241 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 अशा एकूण 696 उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदानासाठी एकूण 2691 मतदान केंद्रांवर 2691 बॅलेट युनट तर 2711 कंट्रोल युनिट अशी एकूण 5402 ईव्हीएम सज्ज ठेवण्यात आली आहेत तर 3475 ईव्हीएम राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 14 हजार 130 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास अशा थेट लढती न होता बहुतांशी सर्वच ठिकाणी सोयीच्या आघाड्या झाल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी राज्यात सत्तेत असलेले दोस्त जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीतही अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. तरीही महायुतीचे नेते विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते अशी अनेक ठिकाणी लढत होत आहे.

सोयीनुसार झालेल्या आघाड्या, त्यामुळे स्थानिक पातळीसह जिल्हा पातळीवरील नेत्यांनी लावलेली ताकद यामुळे सर्व मतदारसंघातील लढती अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत. प्रचारासाठी आठ-दहा दिवसांचाच मिळालेला अवधी यामुळे स्थानिक नेते आणि उमेदवारांनी स्वबळावरच प्रचार यंत्रणा राबवत वातावरण तापवले. त्यातून विकासाच्या आश्वासनांसह एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. जाहीर प्रचारानंतरही उमेदवारांसह नेत्यांनीही जोडण्यांसाठी पायाला भिंगरी लावली. गुरुवारी रात्रीपासून उमेदवारांसह कार्यकर्ते अलर्ट मोडवर होते. शुक्रवारी दिवसभर वैयक्तिक गाठीभेटीद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात होता. अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शनही सुरू होते. स्थानिक मतदारांसह बाहेरगावचे मतदार मतदानाला आणण्यासाठीही नियोजन केले जात होते. शुक्रवारची रात्रही अनेकांनी जागून काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT