कोल्हापूर : दोन वर्षांत खेळामध्ये समाधानकारक प्रगती नसलेल्या विद्याथ्यार्र्ंचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवेश टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना आता परिश्रम घ्यावे लागणार आहे.
ग्रामीण भागात चांगले खेळाडू आहेत; परंतु घरच्या परिस्थितीमुळे किंवा योग्य दिशा मिळत नसल्याने अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी शिंगणापूर (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत निवासी क्रीडा प्रशाला सुरू करण्याचा निर्णय घेतला. केवळ शाळा सुरू केली नाही तर ती कायम सुरू राहावी, निधी अभावी हा उपक्रम बंद पडू नये, याचीही व्यवस्था केली. शाळेची नऊ एकर जागा असून, येथे मोठे मैदान, वसतिगृह आणि स्पोर्टस् स्कूल विकसित करण्यात आले आहे. सहावीच्या वर्गात मुलांना प्रवेश दिला जातो. दहावीपर्यंत या मुलांचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेच्या वतीने केला जातो.
शाळा सुरू झाली, तेव्हाच जिल्हा परिषदेने लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्र आणणार्या विद्यार्थ्याला बाजूला ठेवण्याचे अलिखित धोरण अवलंबले होते. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षे विविध स्पर्धेत मुलं चमकू लागली. गेल्या काही वर्षांपासून या शाळेत मुलांपेक्षा अन्य बाबींवरच प्रशासनातील काही मंडळींनी लक्ष देण्यास सुरुवात केली आणि याठिकाणी खेळापेक्षा राजकारणच अधिक रंगू लागले. ज्याच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपविली, त्यानेच येथे रंग उडविण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम येथील खेळाडूंवर होऊ लागला. परिणामी, यशापासून मुलं दूर राहू लागली, ही बाब जिल्हा परिषदेच्या लक्षात आल्यामुळे प्रथम प्रशासनाने शिंगणापूर शाळेतील झारीतील शुक्राचार्य बदलले. काहींना काढून टाकले. त्यानंतर आता दोन वर्षांत जे विद्यार्थी समाधानकारक प्रगती करणार नाहीत, त्यांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
निवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, भोजन, वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. रग्बी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, मल्लखांब, अॅथलेटिक्स आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
जिल्हा परिषदेच्या वतीने चालविण्यात येणारी राज्यातील एकमेव कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, या उद्देशानेच ही शाळा सुरू करण्यात आली आहे.