कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह युवराज पाटील, अरुण इंगवले, राजवर्धन नाईक-निंबाळकर, माजी सभापती वंदना मगदूम, स्वाती सासने, डॉ. पद्मावती पाटील, कोमल मिसाळ, प्रवीण यादव हे हक्काचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे अडचणीत आले आहेत; तर माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शशिकांत खोत, सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, रसिका पाटील, रोहिणी आबिटकर, रेश्मा देसाई यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे अध्यक्षपदासाठी भाजपच्या शौमिका महाडिक यांना यावेळीही संधी होती. गेल्यावेळी त्या शिरोली पुलाची मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या अगोदर त्यांचे पती अमल महाडिक भादोले मतदारसंघातून निवडून आले होते. हे दोन्हीही मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागणार आहे. अरुण इंगवले सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून आतापर्यंत ते किंवा त्यांचा घरातीलच व्यक्ती सदस्य असायची. परंतु यावेळी त्यांच्या हक्काचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. सभापतिपद भूषविलेले युवराज पाटील मावळत्या सभागृहात सदस्य होते.
त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना थांबावे लागण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, सभापती वंदना मगदूम, डॉ. पद्मावती पाटील यांचे मतदासंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीपासून लांब राहावे लागणार आहे. भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनाही धक्का बसला आहे. याशिवाय मावळत्या सभागृहाचे माजी सदस्य जीवन पाटील, सचिन बल्लाळ, कल्लाप्पाणा भोगण, अरुण सुतार, भगवान पाटील, मनोज फराकटे, शंकर पाटील यांचे हक्काचे प्रभाग आरक्षित झाल्याने तेही अडचणीत आले आहेत. असे असले तरी काही ठिकाणी पती ऐवजी पत्नी किंवा पत्नी ऐवजी पती निवडणूक रिंगणात उतण्याची शक्यता अधिक आहे.