Zilla Parishad Panchayat Samiti Constituency | पाडळी खुर्द, बानगे नवे मतदारसंघ Pudhari File Photo
कोल्हापूर

Zilla Parishad and Panchayat Samiti Constituency | पाडळी खुर्द, बानगे नवे मतदारसंघ

जि.प., पं.स.चे प्रारूप मतदारसंघ जाहीर; 9 मतदारसंघांची नावे बदलली; आता आरक्षणाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांचे प्रारूप मतदारसंघ सोमवारी जाहीर करण्यात आले. करवीर तालुक्यात पाडळी खुर्द आणि कागल तालुक्यात बाणगे हे जिल्हा परिषदेसाठी दोन नवे मतदारसंघ झाले आहेत. करवीर आणि कागल तालुक्यांत पंचायत समितीसाठी प्रत्येकी दोन मतदारसंघांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या नऊ मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत. प्रारूप मतदारसंघ जाहीर होताच, पाहण्यासाठी इच्छुकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही गर्दी केली होती. मतदारसंघांची रचना स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी (गट) आणि पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी (गण) जिल्ह्याच्या 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 67 वरून पुन्हा 68, तर पंचायत समितीची सदस्यसंख्या 134 वरून 136 इतकी झाली. त्यानुसार करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 मतदारसंघांची संख्या 12 वर गेली. या तालुक्यात पाडळी खुर्द असा नवा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ तयार झाला. पंचायत समितीसाठीही दोन नव्या मतदारसंघांसह करवीर पंचायत समितीसाठी 24 मतदारसंघ तयार झाले आहेत.

आजरा तालुक्यात 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा मतदारसंघ होते. सोमवारी जाहीर झालेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेत आजरा हा मतदारसंघ कमी झाला. या ठिकाणी उत्तूर आणि पेरणोली हे दोनच मतदारसंघ राहिले आहेत. पंचायत समितीचेही कोळिंद्रे आणि गरजगाव हे मतदारसंघ रद्द झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या नऊ मतदारसंघाची नावे बदलली

शाहूवाडी तालुक्यातील पिशवी मतदारसंघ बदलून नव्याने बांबवडे, तर करंजफेण बदलून तो आंबार्डे असा करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगर पंचायत आणि हुपरी नगरपालिका झाल्याने हे दोन्ही गट रद्द झाले, त्याऐवजी आळते आणि रुई असे दोन नवे मतदारसंघ करण्यात आले आहेत. राधानगरी तालुक्यातील कौलव मतदारसंघ रद्द करून त्याऐवजी कसबा तारळे हा मतदारसंघ करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील आजरा हा मतदारसंघ नगर पंचायत झाल्याने रद्द करण्यात आला. तालुक्यात यापूर्वी असणार्‍या कोळिंद्रे गटाचे नाव बदलून ते पेरणोली, असे करण्यात आले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी हे मतदारसंघाचे नाव बदलून ते कसबा नूल, असे करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील चंदगड हा मतदारसंघही नगर पंचायत झाल्याने रद्द झाला. त्याऐवजी 2017 मध्ये रद्द झालेला अडकूर मतदारसंघ पुन्हा तयार करण्यात आला आहे. यासह तुर्केवाडी मतदारसंघाचे नाव बदलून ते कुदनूर असे केले आहे.

परिते मतदारसंघ रद्द

करवीर तालुक्यातील परिते मतदारसंघ रद्द करण्यात आला आहे. परिते गावाचा समावेश निगवे खालसामध्ये केला आहे. पाडळी खुर्द हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आल्याने करवीर तालुक्यातील मतदारसंघात बदल झाले आहेत.

हरकत दाखल करण्यास प्रारंभ

सोमवारी जाहीर झालेल्या प्रारूप मतदारसंघांवर दि. 14 जुलैपासूनच हरकत दाखल करण्याची मुभा होती. या मतदारसंघांवर दोन हरकती दाखल करण्यासाठी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आलेही होते. मात्र, त्यात त्रुटी असल्याने नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांत हरकती स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांच्या, तर तहसील कार्यालयात त्या तालुक्यांतील मतदारसंघांच्या हरकती दि. 21 जुलैपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

‘या’ ठिकाणी पाहता येणार प्रारूप मतदारसंघ

प्रारूप मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत पाहता येतील. यासह तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही नागरिकांना पाहता येणार

9 तालुक्यांतील मतदारसंघांत बदल

जिल्ह्यात 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील 9 तालुक्यांपैकी काही मतदारसंघांच्या रचनेत, तसेच त्यांच्या नावात बदल झाले आहेत. पन्हाळा, भुदरगड आणि गगनबावडा या तीन तालुक्यांत कोणताही बदल झाला नाही.

18 ऑगस्टला अंतिम मतदारसंघ जाहीर होणार

दाखल होणार्‍या हरकत, सूचनांची प्रक्रिया सुरू होईल. विभागीय आयुक्त या हरकतींवर निर्णय घेणार आहेत. यानंतर दि. 18 ऑगस्टला मतदारसंघ अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT