कोल्हापूर जिल्हा परिषद Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur News : करवीर, कागलमध्ये जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढणार

सोमवारी गट, गणांची प्रारूप रचना जाहीर होणार; करवीर पंचायत समितीत 24, तर कागलमध्ये 12 सदस्य होणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेसाठी करवीर आणि कागल तालुक्यांत आणखी एक मतदारसंघ वाढणार आहे. आजरा तालुक्यातील एक मतदारसंघ कमी होणार आहे. यामुळे करवीर, कागल आणि आजरा पंचायत समित्यांच्या सदस्यसंख्येतही बदल होणार आहे. सोमवारी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समित्यांच्या गणांची (मतदारसंघ) प्रारूप रचना जाहीर होणार आहे. प्रारूप रचनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांची लगबग सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची जिल्ह्याच्या 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 67 वरून पुन्हा 68 तर पंचायत समितीची सदस्य संख्या 134 वरून 136 इतकी होणार आहे. याकरिता जनगणनेनुसार 27 लाख 53 हजार 995 इतकी ग्रामीण लोकसंख्या ग्राह्य धरली आहे, त्यामध्ये 3 लाख 71 हजार 174 अनुसूचित जातीची, तर 21 हजार 547 अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचारात घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या लोकसंख्येवर आधारित जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार संघ निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कागल आणि करवीर तालुक्यात मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. यापूर्वी कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच, तर पंचायत समितीचे 10 मतदार संघ होते, आता जिल्हा परिषदेसाठी सहा, तर पंचायत समितीसाठी 12 मतदार संघ होणार आहेत.

करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीचे 22 मतदार संघ होते. ते आता नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे 12 तर पंचायत समितीचे 24 मतदार संघ होणार आहेत. आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा मतदार संघ होते. नव्या रचनेत आजर्‍यातील एक मतदार संघ कमी होणार असून, जिल्हा परिषदेचे आता दोन मतदार संघ होतील, तर पंचायत समितीचे चार मतदार संघ असतील.

18 ऑगस्टला होणार मतदार संघांवर अंतिम शिक्कामोर्तब

दि.14 जुलै रोजी प्रारूप मतदार संघ जाहीर होतील. त्यावर दि.21 जुलै पर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती घेता येतील, सूचना देता येतील. या सूचनांवर अभिप्राय तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दि.28 जुलैला विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. या प्रस्तावांनुसार दाखल हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन दि. 11 ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय घेतील. यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकार्‍यांकडे येईल. जिल्हाधिकारी दि. 18 ऑगस्टला मतदार संघ अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत.

करवीर तालुक्यात होणार सर्वाधिक मतदारसंघ

कागल आणि करवीर तालुक्यांत होणारे नवे मतदारसंघ कोणते असतील, हे सोमवारी स्पष्ट होईल. नव्या रचनेमुळे करवीर हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वाधिक मतदारसंघ असलेला तालुका होणार आहे. गेल्यावेळी हातकणंगले आणि करवीर तालुक्यांत जिल्हा परिषदेचे प्रत्येकी 11 मतदारसंघ होते. आता करवीरमध्ये 12 मतदारसंघ असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT