कोल्हापूर : महापालिकेच्या डंपरने धडक दिल्याने दिनेशसिंग साहबसिंग नायक (वय 33, रा. टाकाळा, मूळ सादाबाद, जि. हातरस, उत्तरप्रदेश) हा परप्रांतीय तरुण जागीच गतप्राण झाला. टेंबलाई उड्डाणपुलानजीक शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडली.
अपघातप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी डंपरचालक अमित आकाराम पाटील (वय 35, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दुचाकीस्वार दिनेशसिंग सकाळी 11.30 वाजता कामामिनित्ताने घरातून बाहेर पडला. टेंबलाई उड्डानपुलाजवळ दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कसबा बावडा झूम प्रकल्पाकडे जाणार्या महापालिकेच्या डंपरने धडक दिली.
धडक होताच नायक तोल जाऊन रस्त्यावर कोसळला. डंपरचे चाक त्याच्या पोटावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिनेशसिंग मेंहदी कारागीर म्हणून काम करीत होता. टाकाळा परिसरात भाड्याने खोली घेऊन कुटुंबीयासमवेत त्याचे वास्तव्य होते. अपघातात दिनेशसिंग यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय, मित्रासह नातेवाईकांनी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात गर्दी केली.
उत्तरीय तपासणीनंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिनेशसिंगच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. अपघातानंतर नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले. मात्र, अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. जखमीवर वेळीच उपचार होऊ शकले असते तर त्याचे प्राण वाचले असते.