कोल्हापूर : मोबाईलवरून महिलेची छेडछाड केल्याच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मोरेवाडी (ता. करवीर) येथे घडली. पीडित तरुणाच्या पत्नीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणाची सुटका केली. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मारहाणीत आदिनाथ कृष्णात कुईगडे (वय 30, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, मोरेवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आदिनाथ कुईगडे याने गावातील एका विवाहित महिलेशी मोबाईलवरून चॅटिंग करून तिची छेड काढल्याचा संशय संशयितांना होता. या रागातून त्यांनी आदिनाथला धडा शिकवण्याचा कट रचला होता. याप्रकरणी आदिनाथची पत्नी ऋतिका आदिनाथ कुईगडे (वय 23) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आकाश ऊर्फ करण दत्तात्रय भिलुगडे (28), अक्षय सुरेश भिलुगडे (28), अभय बाळासाहेब भिलुगडे (23), इंद्रजित बाळासाहेब मोरे (31), कुलदीप साताप्पा कोथळे (28), ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे (24, सर्व रा. मोरेवाडी, ता. करवीर) या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयितांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्याने आदिनाथ गेल्या दोन दिवसांपासून मोरेवाडीतील आपल्या घरी गेला नव्हता. तो शिंगणापूर येथे आपल्या पत्नीकडे राहत होता. संशयित दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. रविवारी तो शिंगणापूरमध्ये असल्याची माहिती मिळताच संशयितांनी रात्री उशिरा तेथे धाव घेतली. त्यांनी आदिनाथला पांढर्या रंगाच्या मोटारीत जबरदस्तीने कोंबून काठी, सळी, पट्टा आणि दगडाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पतीचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच पत्नी ऋतिका यांनी तत्काळ करवीर पोलिस ठाणे गाठले आणि पतीच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक निरीक्षक बाबासाहेब सरवदे, हवालदार विजय तळसकर आणि विजय गुरव यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी संशयितांचा माग काढून त्यांच्या तावडीतून आदिनाथची सुखरूप सुटका केली. जखमी आदिनाथवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋतिका कुईगडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मध्यरात्रीच सर्व सहा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.