हातकणंगले : हातकणंगले-कुंभोज रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आकाश अजित आबदान (वय 21, रा. रूई, ता. हातकणंगले) याचा मृत्यू झाला, तर अभिराज बबन काश्मिरे (16), हर्षवर्धन जिनेंद्र काश्मिरे (19, दोघे रा. रूई) व राहुल अशोक खोत (30, रा. हातकणंगले) जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
आकाश, अभिराज व हर्षवर्धन हे बुलेट (क्र. एम.एच. 51 जी 7227) वरून कुंभोजकडून हातकणंगलेच्या दिशेने येत होते, तर राहुल खोत मोटारसायकलवरून कुंभोजच्या दिशेने जात होता. नेज हद्दीतील लक्ष्मी मंदिरजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी गंभीर होती की, यात आकाशला जबर मार लागला, तर अभिराज आणि हर्षवर्धन जखमी झाले. त्यांना त्याच मार्गावरून जात असलेल्या एका खासगी वाहनातून हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाने त्यांना पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. आकाशचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.