कोल्हापूर : फुटबॉलच्या सरावानंतर मित्रासमवेत पोहण्यासाठी शिंगणापूर येथील बंधार्यावर गेलेल्या मंगळवार पेठ येथील तरुणाचा पंचगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ओम राजेंद्र पाटील ऊर्फ माकने (वय 20) असे त्याचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. हाता- तोंडाला आलेल्या उमद्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला. त्यांचा आक्रोश काळीज हेलावणारा होता. या घटनेमुळे मंगळवार पेठेसह परिसरात शोककळा पसरली आहे.
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर पुण्यातील नामांकित फर्ममध्ये ओम पाच, सहा महिन्यांपासून कार्यरत होता. आई, वडिलांसह मित्रांना भेटण्यासाठी तरुण परवा कोल्हापुरात आला होता. रविवारी (दि. 18) सकाळी मित्रासमवेत त्याने फुटबॉलचा दीड तास सराव केला. त्यानंतर दहा वाजता मित्रासमवेत पोहण्यासाठी शिंगणापूर येथील बंधार्यावर गेला.
पंचगंगा नदीत पोहत असताना त्याला दम लागला. क्षणार्धात खोलवर पाण्यात बुडाला. हा प्रकार मित्र आणि बंधार्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आला. मित्रांनी आरडा-ओरड केल्यानंतर तरुणांसह काठावरील नागरिकांनी पाण्यात उड्या टाकून तरुणाचा शोध सुरू केला. काही काळानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. उत्तरणीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. करवीरचे पोलिस किशोर शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
ऐन उमेदीतील ओमचा शिंगणापूर बंधार्यात मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय, नातेवाईक, खेळाडूंसह मंगळवारपेठेतील नागरिकांनी घटनास्थळ, शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. ओमचे वडील राजेंद्र पाटील यांचा मंगळवार पेठ येथील एका हॉस्पिटलजवळ नाश्ता सेंटरचा व्यवसाय आहे.
अत्यंत कष्टातून राजेंद्र पाटील यांनी संसार फुलवित मुलाचे शिक्षण पूर्ण केले होते. एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई, वडिलांना जबर धक्का बसला. त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ओमच्या मित्रांसह मंगळवारपेठ येथील नागरिकांना शोक अनावर झाला होता.